This post's average rating is: 5
कोकणातील नागोठणे ह्या टुमदार
छोट्याशा गावात आम्हाला येऊन पाच वर्षे होत आली होती. काही वर्षे गेल्यानंतर आम्हाला कोकणातील हे गाव आवडायला लागले होते. आम्ही तिथेच स्थायिक होण्याचं जवळ जवळ ठरवलं होतं. वडील फॉरेस्ट खात्यात उपविभागीय वनाधिकारी (Divisional Forest Officer) असल्यामुळे दर तीन किंवा चार वर्षांनी
आमची बदली होत असे. मैत्री जशी एकरूप होऊन शाश्वत होण्यास प्रारंभ होत होती, त्याचवेळी आम्हाला पुन्हा एकदा मूळापासून उचलले जात होते. नवीन गाव, नवीन शेजारी, नवीन शाळा, नवीन मित्र आणि जुन्या आठवणींचे ते न विसरणार दुःख, जे संपायला खूप काळ लागत असे.
आम्हा बहीण भावंडाना दर काही वर्षांनी नवीन मित्र मैत्रिणी जोडायला फार त्रास होई कारण जुन्या मैत्रीची आठवण मनात ताजी असे. आमच्यासाठी, दर काही वर्षांनी होणारे हे बदल मानसिकदृष्ट्या थकवणारे होते. एकाच वेळी नवीन मैत्रीची बीजे रुजवताना, जुन्या मैत्रीच्या मुळांचा वेदनादायक खेच हृदयात अजूनही गडद होत असे. नव्या ठिकाणी बदली होऊन आल्यावर मग काही दिवस जुन्या मित्रांबरोबर पत्रव्यवहार होत असे. नवीन ठिकाणचे लोक , मित्र , शाळा , गाव ह्याचे एपिसोड मध्ये जुन्या मित्रांना अपडेट जात असे. हळू हळू शाळेत नवीन मित्र मिळाले म्हणजे मग सर्व सुरळीत होऊन जायचे.
मी त्या वेळी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होतो. माझ्या दोन मोठ्या बहिणी नर्सिंग कोर्से साठी मुंबईला जसलोक हॉस्पिटल आणि जे. जे. हॉस्पिटलला हॉस्टेल मध्ये राहत होत्या. घरी मी, आई आणि माझी लहान बहीण आम्ही तिघंच असायचो. त्या
वर्षी, पुन्हा एकदा, आमच्या वडीलांची एका नव्या ठिकाणी बदली झाली, यावेळी खोपोलीला.
कायमच्या बदलामुळे थकून गेलेले आम्ही भावा-बहीणींनी प्रचंड विरोध दर्शवला.
“नवी शाळा, नवे गाव,
नवे मित्र ? आम्ही आता हे सहन करू शकत नाही.”
आमच्या वडिलांना आमच्या मानसिक
कष्टांची खोली समजली. त्यांनी ठरवले की, ते एकटेच खोपोलीला जातील, आठवड्यातून काम करून,
प्रत्येक शनिवारी आणि रविवारी घरी परततील. ह्या त्यांच्या निर्णयाने आमच्या हृदयांत
त्यांच्याबद्दलचे प्रेम आणि आदर अजून वाढला.
सुदैवाने त्या गावात मला आणि माझ्या सर्व भावंडाना अत्यंत चांगले मित्र मैत्रिणी मिळाले आणि ती मैत्री आजही टिकून आहे. दररोज संध्याकाळी शाळा सुटल्या नंतर आम्ही मित्र गावात फेरफटका मारायला निघत असू. गावाचा परिसर लहान होता आणि वस्ती समाजा नुसार वसलेली होती. ब्राम्हण आळी, आंगर आळी, कुंभार आळी, गुरव आळी असे विभाग होते. मोहल्ल्यात मुस्लिम वस्ती होती.
गावाबाहेरून अंबा नदी वाहत होती. तिच्यावर निजामशाही काळात १५८० साली चुनकळीने बांधलेला पूल होता. एका वेळी एकाच बाजूने वाहन जाऊ शकेल एवढाच तो रुंद होता. संध्याकाळी आम्ही मित्र फिरायला गेल्यानंतर त्या पुलाच्या कठड्यावर बसून
गप्पा मारत असू आणि आणि एखादे वाहन आले कि दोन्ही पाय वर कठड्यावर घेऊन ‘थ्रिल‘ अनुभवत असू.
खरंतर हा तरुणपणातील मूर्खपणाचा आनंद होता, दुसरं काय ?. कारण त्या परिस्तिथीमध्ये धरायला काही आधार नसे आणि एका बाजूला वाहन असे आणि दुसऱ्या बाजूला नदी. पुलावरून एखादा पडला तर सरळ नदीतच. सुदैवाने तसे कधी घडले नाही. एक
माणूस जेमतेम बसू शकेल एवढाच तो कठडा रुंद होता.
ह्या अंबा नदीचे पात्रं उखळ
होते. दरवर्षी ह्या अंबा नदीला पावसाळ्यात पूर येत असे आणि पुराचे पाणी गावाबाहेर असलेल्या एस.टी. स्टॅन्ड मध्ये आणि कोळी वाड्यामध्ये शिरत असे. त्यामध्ये मालमत्तेचे जरी नुकसान होत असले
तरी कधी जीवितहानी झाली नव्हती. त्यामुळे
गावकरी नदीला पूर आल्यानंतर पूर बघायला भर पावसात बाहेर पडत असत आणि ह्यावर्षीचा पूर
मागील कित्येक वर्षांच्या पुरा पेक्षा किती
जास्त आहे किंवा कमी आहे, पाणी मागच्यावर्षी कुठपर्यंत आले होते किंवा नव्हते ह्या
विषयावर पूर बघत वाद विवाद करीत असत.
रविवार हा आठवडी बाजाराचा दिवस असायचा. बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरत असल्यामुळे आजूबाजूच्या सर्व खेड्यापाड्यातून गावकरी मोठ्या संख्येने बाजाराला येत असत. पावसाळ्याच्या
दिवसात लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असत आणि दुकानदारहि बाजाराच्या दोन दिवस अगोदरच
आवश्यक तो माल भरून ठेवत असत.
त्या दिवशी, म्हणजे शनिवारी २२ जुलै १९८९
रोजी पावसाचा मूड काही वेगळाच दिसत होता. संध्याकाळ पासून पावसाने जोर धरला होता. दुसऱ्या दिवशी रविवारी बाजाराचा दिवस असल्यामुळे दुकानदारांनी आवश्यक तो मालसाठा आपल्या दुकानात करून ठेवला आणि निर्धास्तपणे झोपी गेले.
रात्री पावसाचा जोर संपूर्ण कोकणपट्टीत अचानक वाढला. रायगड, रत्नागिरी, आणि आजूबाजूच्या परिसराला मुसळधार पावसाने झोडपायला सुरवात केली होती. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा ह्यांचे थैमान सुरु होते. कोंकणच्या ह्या प्रदेशावर पाऊस न:
भूतो न: भविष्यती असा कोसळायला लागला. मात्र निसर्गाचा ह्या रुद्रावतार बघायला कोणीही जागे नव्हते.
त्याकाळी ग्रामपंचायतीने गावात रात्रीची गस्त घालायला गुरखे नेमले होते. रात्री केव्हातरी त्यांच्या शिट्ट्यांच्या आवाजाने आणि ओरडण्याने काही
लोक जागे झाले. अंबा नदीला पूर आला होता पण पुराच्या पाण्याने बस स्टॅन्ड ची हद्द ओलांडून गावात प्रवेश करायला सुरवात केली होती. पाण्याचा प्रवाहाचा जोर पाहता लोकांनी लगेच शेजाऱ्या पाजाऱ्यांना उठवायला सुरवात करून आपले घरगुती सामान सुरक्षित ठिकाणी हलवायला सुरवात केली. पण उशीर झाला होता. पाणी वेगाने गावात शिरायला लागले होते पाहता पाहता पाण्याने बाजारपेठ आणि आजूबाजूची वस्ती गिळंकृत करायला सुरवात केली होती. लोक जीव वाचवायला गावाच्या पूर्व दिशेला धावले. ज्यांना घरातून निघता आले नाही त्यांनी घराच्या पोटमाळ्यावर, छपरावर आश्रय घेतला. पुराचे पाण्याने काही मिनिटातच संपुर्ण बाजारपेठ आणि आजूबाजूचा परिसर पाण्याखाली घेतला.
सकाळी सात साडे सात च्या सुमारास
आमच्या घराच्या दारावर थाप पडली. वडिलांनी दार उघडले. बाहेर एक ओळखीचे कुटुंब दारात
उभे होते.. त्यांचा थोरला मुलगा हाच कुटुंब प्रमुख होता. त्याचे वडील वारले होते. पाच
ते सहा जण होते. सर्वजण नखशिखांत भिजलेले होते आम्ही त्यांना आत घेतले.
“आमचे घर पाण्याखाली
गेले आहे साहेब. तुमच्या कडे काही दिवस राहायला मिळेल का ? ”
” नक्कीच !! खूपच पाऊस
झालेला दिसतोय रात्रीपासून.” वडील बोलले.
आम्ही गावाच्या वरच्या भागात
राहत होतो. आम्हाला रात्रीच्या ह्या पूर परिस्थितीची काहीच कल्पना नव्हती. पुराचे पाणी
आम्ही राहत असलेल्या घरापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर आले होते. त्यामुळे आमचा परिसर
सुरक्षित राहिला होता.
खरं पाहता आम्हाला त्या गावात
सरकारी बंगला किंवा क्वार्टर असे काही मिळाले नव्हते. त्यामुळे आम्ही भाड्याने त्या
घरात राहत होतो. दहा बाय सोळाच्या दोन खोल्या आणि स्वयंपाकघर असा तो ‘सेटअप’ होता.
आता एवढ्याशा लहान घरात ह्या
नवीन सहाजणांची भर पडली होती. आईने देखील सर्वांचे स्वागत केले आणि चहा ठेवायला आत
गेली. तिने त्या कुटुंबातील महिलांना आत बोलावून कपडे बदलायला सांगितले. ते लोकं अंगावरच्या
कपड्यानिशी घराबाहेर पळाले होते. आईने त्यांना तिच्या साड्या कपाटातून काढून दिल्या
आणि सगळ्यांसाठी चहा ठेवला.
“साहेब, माझी बहीण तिच्या
लहान बाळासकट आमच्या घराच्या माडीवर अडकली आहे.” ते कुटुंबप्रमुख म्हणाले.
हे ऐकून आमचे वडील आणि आम्ही स्तंभितच झालो.

उखळ नाही, उथळ
Good
छान मी 2 पार्ट वाचायला उत्सुक आहे
Loved it
Khoop chan lekhan aahe.
Very good and brave experience
धनंजय पुरा बद्दल लिहिलेले लेखन खूप सुंदर आहे. मी पण हा पूर अनुभवला असून फरक एवढेच आहे की माझ्या घरात एक पुरुष पाणी होते आणि मला पण दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला होता होता खाण्यापिण्याचे हाल आणि गावाशी तुटलेला संपर्क हेलिकॉप्टर मधून जमिनीवर पडलेली खाद्यपदार्थाची पॉकेट. ते सर्व भयंकर होते. अजूनही 1989 मधील पुराची दरवर्षी आठवण येते.
नैसर्गिक प्रकोपाचा, पूरपरिस्थितीचा अनुभव उत्तमरीत्या मांडून वाचनीय केलाय.