कॉलेजचे दुसरे वर्ष सुरू झाले होते. पहिल्याच दिवशी समजलं की रविंद्रने आमचं कॉलेज सोडून दुसरीकडे ‘ॲडमिशन’ घेतलं होतं. मी ‘फर्स्ट क्लास फर्स्ट’ आल्यामुळे त्याला रिझल्टच्या दिवशी मित्रांच्या खांद्यांवरून उतरावं लागलं होतं. त्याला ते खूप अपमानास्पद वाटलं होतं.
कॉलेजमध्ये आता माझे बरेच मित्र झाले होते. मित्र म्हणण्यापेक्षा त्यांना सहकारी म्हटलेलं जास्त सयुंक्तिक होईल. कारण त्यातले बरेच जण नंतर माझ्याबरोबर वाकड्यात शिरले.
अण्णा मला नेहमी म्हणायचे,
“जास्ती मित्र कधी करू नकोस. ज्याचे खूप मित्र असतात; त्याचा कोणीच मित्र नसतो आणि ज्याचा एकच मित्र असतो; तोच त्याचा खरा मित्र असतो. तुला घडवण्यात आणि बिघडवण्यात तुझे मित्रच कारणीभूत असतील.”
अण्णांचे हे म्हणणे बरोबर होते मागील काही वर्षात मला त्याचा प्रकर्षाने अनुभव आला होता आणि त्यामुळेच मित्रांच्या बाबतीत मी खूप ‘चूझी’ होतो.
वर्गामध्ये सगळेजण मला आता वेगळ्याच नजरेने पाहू लागले होते. मी मात्र होतो तसाच होतो, पॅरागॉनची स्लीपर, जुनी पॅन्ट आणि आता फक्त एक नवीन शर्ट घेतला होता.
असोसिएशनच्या ‘मिटिंग्स’ सुरू झाल्या होत्या. येत्या वर्षभरात कोणकोणते कार्यक्रम आयोजित करायचे, यावर्षी कोणता नवीन उपक्रम घ्यायचा, याचं ‘प्लॅनिंग’ सुरू झालं होतं.
हिंदी असोसिएशनची मिटिंग अजून झाली नव्हती; कारण रविंद्र निघून गेल्यामुळे पुढाकार घ्यायला कोणी नव्हतं.
एके दिवशी क्लास सुटल्यानंतर हिंदीच्या प्राध्यापिकांनी मला विचारलं,
“क्या तुम मेरे असोसिएशन का काम संभालोगे?”
मी थोड्या संकोचाने म्हणालो,
“इसमें काफी वक़्त जाएगा, मॅडम। हो सकता है, पढ़ाई के लिए उतना वक़्त नहीं दे पाऊँगा।”
त्या हसत म्हणाल्या,
“अरे, तुमको कहाँ दिन भर असोसिएशन का काम करना है? हफ्ते-दो हफ्ते में मेरे साथ बैठकर प्लॅनिंग तो करनी है, नोटिस बोर्ड पर सूचना देनी है। फिर कॉम्पिटिशन के बाद हमारी हेड्स की मीटिंग बुलानी है, और हम जिन्हें चुनेंगे, उनके नाम तुम्हें नोटिस बोर्ड पर लिखने हैं… बस!”

मी थोडा संकोचत म्हणालो,
“लेकिन वो…?”
त्या लगेच म्हणाल्या,
“अरे, क्या तुम भी? इतना भी नहीं कर पाओगे? चलो, मैं तुम्हें गाइड करूँगी। अब तो ठीक है?”
मी पुढे काही बोलण्याआधीच त्या हसत म्हणाल्या,
“और वैसे भी, तुम्हारे जैसे जिम्मेदार लड़के पर ही ये काम अच्छा लगेगा।”
त्यांचा ‘जिम्मेदार’ हा शब्द ऐकून जणू कोणीतरी माझ्या डोक्यावर जड सामान ठेवले आहे, असं मला वाटायला लागले. मी किती ‘जबाबदार’ होतो, हे मला माहीत नव्हतं; पण मला ‘जबाबदार’ संबोधून माझ्यावर एक ‘जबाबदारी’ टाकली जात होती.
खरं तर मला अशा गोष्टींमध्ये फारसा रस नव्हता. माझं जग म्हणजे अभ्यास, जिम, क्रिकेट आणि स्वतःपुरतं मर्यादित आयुष्य. पण वर्गात पहिला आल्यापासून लोकांच्या नजरा बदलल्या होत्या. काहींच्या नजरेत कौतुक होतं, काहींच्या नजरेत अंतर…आणि काहींच्या नजरेत स्पर्धा.
आता त्यांना नकार देणं शक्य नव्हतं. मी थोडा विचार करून म्हणालो,
“ठीक है मॅडम, मैं कोशिश करूँगा.”
असं म्हणत मी थोड्या नाखुशीनेच त्यांना होकार दिला.
आम्ही हिंदी असोसिएशनच्या बैठका घेणे सुरु केले. कविता लेखन, कथा लेखन, निबंध स्पर्धा, वादविवाद असे एकामागून एक कार्यक्रमांचे नियोजन होऊ लागले.
मॅडम प्रत्येक वेळी माझं मत विचारायच्या. सुरुवातीला मी फक्त “ठीक है” किंवा “जैसा आप कहें” एवढंच बोलायचो; पण हळूहळू माझ्यातला संकोच कमी होऊ लागला. मनात एक वेगळीच जाणीव निर्माण झाली होती. कालपर्यंत ज्याच्याकडे कोणी विशेष लक्ष देत नव्हतं, तोच आज असोसिएशनचा प्रतिनिधी म्हणून उभा होता.
त्या दिवसांत मला एक गोष्ट प्रथमच जाणवली, माणूस फक्त पुस्तकांनी मोठा होत नाही; जबाबदाऱ्या देखील त्याला घडवत असतात.
मी हिंदी असोसिएशनची पहिली स्पर्धा आयोजित केली. ती एक निबंध स्पर्धा होती. स्पर्धेची जाहिरात करण्यासाठी मी कॉलेजच्या दोन्ही इमारतींमधील सर्व नोटीस बोर्डांवर सूचना लावल्या. स्पर्धेला जोरदार प्रतिसाद मिळाला. अनेक विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला. मीही स्पर्धेत सहभागी झालो आणि मला तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं.
कॉलेजमध्ये पहिल्या वर्षी प्रवेश घेताना, माझ्याबाबतीत भूतकाळात घडलेल्या घटनांमुळे मी बराच अंतर्मुख झालो होतो. क्रिकेट आणि वेटलिफ्टिंग वगळता मी कोणत्याही स्पर्धेत भाग घेत नव्हतो. मी कायम मागेच राहायचो.
हिंदीच्या प्राध्यापिकांनी हे ओळखलं होतं. त्या मला सतत विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करू लागल्या. माझ्यातील बुजरेपणा आणि नकारात्मक दृष्टिकोन दूर व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. तसेच माझ्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत म्हणून त्यांनी मुद्दाम हिंदी असोसिएशनची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती.
त्या केवळ मलाच नव्हे, तर प्रत्येक विद्यार्थ्याला स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सांगत असत. खरंतर, प्रत्येक शिक्षकाचं हे कर्तव्य असतं की विद्यार्थ्यांमधील गुण ओळखून त्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्याला योग्य मार्गदर्शन करावं.
त्या मला म्हणाल्या,
“तुम सभी स्पर्धाओं में भाग लिया करो। इस साल से मैं एक अलग धनंजय को देखना चाहती हूँ।”
त्यांचे हे शब्द माझ्या अंतर्मनात कुठेतरी खोलवर रुजले गेले.
अभ्यासाबरोबरच क्रिकेट प्रॅक्टिस, जिम, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग आणि असोसिएशनचे कार्यक्रम आयोजित करणे, या सगळ्या उपक्रमांत मी स्वतःला झोकून दिलं. हळू हळू माझ्या लक्षात येऊ लागले कि, आयुष्य म्हणजे केवळ स्वतःबद्दल विचार करणे नव्हे; तर समाजामध्ये उभे राहून आपली जबाबदारी पार पाडणे हे पण महत्वाचे आहे.
या सगळ्यात माझा बराच वेळ जाऊ लागला. कॉलेज सकाळी सात वाजता सुरू होऊन दहा-साडेदहा पर्यंत सुटत असे. क्रिकेटची प्रॅक्टिस कॉलेज सुटल्यानंतर होत असल्याने मला घरी परतायला दुपार होत असे.
घरी आल्यानंतर मी तीन-चार तास अभ्यास करत असे आणि संध्याकाळी पुन्हा जिमला जात असे. जिममध्ये दोन तास व्यायाम करून घरी परतायला रात्रीचे आठ वाजत. त्यानंतरही मी रात्री बारा वाजेपर्यंत अभ्यास करत असे.
मागे सांगितल्याप्रमाणे, कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवण्यासाठी ‘आर्ट्स’ शाखा निवडली होती. त्यामुळे परीक्षा जवळ आल्यावरच त्यांच्या हातात पुस्तकं आणि नोट्स दिसत असत.
पण मी मात्र पहिल्या दिवसापासूनच अभ्यासासाठी दररोज पाच तास निश्चित केले होते. एखादा इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंटचा विद्यार्थी ज्या गांभीर्याने अभ्यास करतो, त्याच गंभीरतेने मी बी.ए.चा अभ्यास सुरू केला होता.
कॉलेजमध्ये प्रवेश मिळणं ही माझ्यासाठी जणू देवाने दिलेली एक अमूल्य देणगीच होती. त्या भावनेनेच मी अभ्यास करत होतो.
कॉलेज नियमित सुरू झालं होतं. कांबळे सर जेव्हा जेव्हा समोर येत, तेव्हा तेव्हा माझ्याकडे रागाने पाहिल्याशिवाय पुढे जात नसत. आता त्यांना दररोज त्यांची सगळी ‘लेक्चर्स’ घ्यावी लागत होती. त्यात मी पहिल्या वर्षी त्यांचा विषय सोडून हिंदी विषय घेऊन कॉलेजमध्ये ‘फर्स्ट क्लास फर्स्ट’ आल्यामुळे त्यांच्या वर्मी लागलं होतं.

पण त्या दुःखापेक्षा, आता त्यांना सकाळपासून सर्व लेक्चर्स घ्यावी लागत होती आणि त्याला मी कारणीभूत होतो, याचाच त्यांना अधिक राग आणि दुःख होतं.
एकदा मराठी असोसिएशनने ‘मराठी कथा स्पर्धा’ आयोजित केली होती. मी अभ्यासात आणि इतर उपक्रमांत स्वतःला इतकं गुंतवून घेतलं होतं की, या स्पर्धेची ‘नोटीस’ माझ्या नजरेतच आली नव्हती. खरं तर, त्या स्पर्धेची जाहिरातही म्हणावी तशी झाली नव्हती.
कॉलेजला गेल्यानंतर मराठी असोसिएशनच्या प्राध्यापिका मला म्हणाल्या,
“तू कथा लेखन स्पर्धेत भाग घेत आहेस ना?”
“नाही मॅडम, स्पर्धा कधी आहे?”
त्या आश्चर्याने म्हणाल्या,
“अरे, स्पर्धा आजच आहे आणि सुरूही झाली आहे! आणि तू भाग न घेण्याचं काय कारण आहे बरं?”
मी म्हणालो,
“माझ्या लक्षातच आलं नाही की आज स्पर्धा आहे.”
त्या लगेच म्हणाल्या,
“ठीक आहे. आत जा आणि स्पर्धेत भाग घे.”
मी थोडासा संकोचत म्हणालो,
“पण मी काहीच तयारी केलेली नाही.”
“त्याने काही फरक पडत नाही. तुला सुचेल त्यावर कथा लिही.”
मी वर्गात गेलो. मराठी कथा स्पर्धा असल्यामुळे हिंदी कथा आणि निबंध स्पर्धांच्या तुलनेत अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. जवळजवळ चाळीस ते पन्नास विद्यार्थी त्या स्पर्धेत सहभागी झाले होते. संपूर्ण वर्ग कथालेखनात मग्न झाला होता.
स्पर्धा सुरू होऊन बराच वेळ झाला होता. मी परीक्षकांकडून पेपर घेतला आणि बेंचवर जाऊन बसलो. काय लिहावं, तेच सुचत नव्हतं. शालेय निबंधांशिवाय मी आतापर्यंत असं काहीच लिहिलं नव्हतं.
दोन दिवसांपूर्वीच हिंदी निबंध स्पर्धा झाली होती आणि त्यात माझा तिसरा क्रमांक आला होता. तेवढाच काय तो आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला होता.
बराच विचार करून मी लिहायला सुरुवात केली.
कथा मध्यावर आली असतानाच वेळ संपली. बहुतेक जणांचं लिहून झालं होतं. मी आणखी पंधरा-वीस मिनिटांचा वेळ मागितला. कथा पूर्ण करून मी ती परीक्षकांकडे दिली आणि बाहेर पडलो. आठवडाभरात त्या स्पर्धेचा निकाल लागणार होता.

एक-दोन दिवसांनी मराठीच्या प्राध्यापिकांनी मला बोलावलं आणि म्हणाल्या, “तू ही कथा लिहिली आहेस, असं वाटत नाही.” मी आश्चर्यचकित होऊन विचारलं, “मॅडम, तुम्हाला असं का वाटतं की ही कथा मी लिहिली नसावी?”
त्या म्हणाल्या,
“कारण आतापर्यंत कॉलेजच्या स्पर्धांमध्ये माझ्या वाचनात अशी कथा कधी आली नाही.”
मला काहीच समजलं नाही. मी काही न बोलता तसाच उभा राहिलो.
त्या पुढे म्हणाल्या,
“कथेमध्ये तू लिहिलेल्या प्रसंगांचं वर्णन खूप कल्पनात्मक आहे. तू वाचन वगैरे करतोस का?”
“होय, मॅडम.”
“ठीक आहे, जा तू.”
दुसऱ्या दिवशी स्पर्धेचा निकाल लागला. कॉलेजला गेल्यानंतर सगळे माझं अभिनंदन करू लागले. त्या स्पर्धेत माझा प्रथम क्रमांक आला होता. मराठी असोसिएशनच्या नोटीस बोर्डावर प्रथम क्रमांकावर माझंच नाव झळकत होतं.

अण्णांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांनी घरी पुस्तकांचा अक्षरशः खजिनाच उभा केला होता. त्यात शेक्सपियरचं रोमिओअँडज्युलिएट, सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या शेरलॉक होम्सच्या कथा, एडगर राईस बरो यांच्या टारझन कथा, बाबुराव अर्नाळकर यांच्या रहस्यकथा, नारायण धारप यांच्या भयकथा, जयंत नारळीकर यांच्या विज्ञानकथा, तसेच जिम कॉर्बेट आणि
केनेथ अँडरसन यांच्या शिकारकथा, अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा मोठा संग्रह होता.
मलादेखील लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड होती. शाळेला सुट्टी लागली की, त्या पुस्तकांपैकी प्रत्येक पुस्तक आम्ही मुलांनी वाचून काढावं, असा अण्णांनी नियमच केला होता.
मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही भावंडं आणि आमचे काही पुस्तकप्रेमी मित्र-मैत्रिणी पुस्तकं घेऊन एखाद्या गुलमोहराच्या झाडाखाली बसत असू आणि तासन्तास वाचनाचा आनंद लुटत असू.

एक-दोघेजण झाडावर चढून फांद्यांवर बसत आणि तिथेच पुस्तक वाचनाचा आनंद घेत. आम्ही प्रत्येकजण बरोबर चिंचा, कैऱ्या आणि तिखट-मिठाच्या पुड्या घेऊन जात असू. मग त्या आंबट चिंचा आणि कैऱ्या तिखट-मिठ लावून खात-खात पुस्तकवाचनात रमून जात असू.
शेक्सपियरचं लिखाण प्रारंभिक आधुनिक इंग्रजीत असल्यामुळे ते आमच्या डोक्यावरून जात असे. त्यामुळे तेवढं सोडून बाकीच्या पुस्तकांचा आम्ही अक्षरशः फडशा पाडत असू.
सुट्टीच्या दिवसांत त्या पुस्तकांना कव्हर लावणे, फाटलेली पानं चिकटवणे, लेखकांच्या नावानुसार ती पुस्तकं मोठ्या लाकडी पेटीत व्यवस्थित लावून ठेवणे, असे विविध उपक्रम अण्णा आम्हाला देत असत. त्यामुळे पुस्तकांबद्दल एक वेगळीच आपुलकी निर्माण झाली होती.
एकेक पुस्तक दहा वेळा वाचलं तरी मन भरत नसे. ते लेखकच तसे होते.
प्रत्येक लेखकाची लिहिण्याची एक वेगळी शैली असते. त्यांच्या विचारांमधून आणि कल्पनाशक्तीतून ते कथा-कादंबऱ्यांमधील प्रसंग उभे करत असतात. काही लोक केवळ वेळ घालवण्यासाठी वाचन करतात; पण लेखकाने लिहिलेल्या प्रसंगांशी किंवा संवादांशी ते समरस होतातच असं नाही.
माझ्या मते, वाचन करताना त्या त्या लेखकाने उभ्या केलेल्या प्रसंगांशी समरस होऊन तो प्रसंग वैयक्तिकरित्या अनुभवणं, म्हणजेच वाचनाचा खरा आनंद होय.
मी मराठी कथास्पर्धेत लिहिलेली कथा ही एक लघु भयकथा होती. ती कथा मी अवघ्या एका तासात लिहून काढली होती. अर्थात, त्या कथेच्या भाषेवर मी वाचलेल्या भयकथा आणि इतर साहित्याचा प्रभाव होता; पण कथेतील प्रसंग आणि वर्णनं मात्र पूर्णपणे माझ्या कल्पनाशक्तीतून आलेली होती.
विविध लेखकांच्या साहित्याच्या वाचनामुळे मला माझ्या कथेचा विषय थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडण्यात यश आलं होतं. अण्णांनी लावलेल्या वाचनाच्या सवयीचा हा परिणाम होता की, माझ्या त्या मराठी कथेला स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळालं.
काही दिवसांनी मी हिंदी असोसिएशन तर्फे सुद्धा कथा स्पर्धा आयोजित केली. त्या स्पर्धेलाही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अर्थात, मीदेखील त्यात भाग घेतला आणि त्या स्पर्धेतही माझा प्रथम क्रमांक आला.
मराठी आणि हिंदी अशा दोन्ही कथा स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे कॉलेजमध्ये माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली.
कथा स्पर्धांमधील हे यश माझ्यासाठी केवळ पारितोषिक मिळवण्यापुरतं मर्यादित नव्हतं; तर ते वाचनाने दिलेल्या समृद्ध कल्पनाशक्तीचं फळ होतं.
विविध लेखकांचं साहित्य वाचताना त्यांच्या शैली, प्रसंगांची मांडणी, संवादांची ताकद आणि वातावरणनिर्मिती हळूहळू मनावर कोरली जात गेली होती. त्यामुळे कथा लिहिताना शब्द आपोआप प्रवाही होत गेले.
अण्णांनी आम्हाला लावलेली वाचनाची सवय हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शिदोरी ठरली. पुस्तकांनी केवळ ज्ञान दिलं नाही, तर विचार करण्याची नवी दृष्टीही दिली.
प्रत्येक पुस्तक एखाद्या नव्या जगाचं दार उघडत गेलं. कधी रहस्यकथांमधून उत्कंठा अनुभवायला मिळाली, कधी भयकथांमधून वातावरणनिर्मितीची ताकद समजली, तर विज्ञानकथांमधून कल्पनाशक्तीला अमर्याद भरारी मिळाली.
त्या दिवसांपासून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागली, वाचन माणसाला केवळ विद्वान बनवत नाही, तर त्याच्या विचारविश्वालाही विस्तार देतं.
पुस्तकांमधून मिळणारे अनुभव हे प्रत्यक्ष आयुष्य जगण्याइतकेच जिवंत असतात. आणि कदाचित म्हणूनच, त्या कथास्पर्धांमध्ये मिळालेली पारितोषिकं माझ्यासाठी फक्त ट्रॉफी किंवा सर्टिफिकेट्स नव्हती; ती अण्णांनी दिलेल्या वाचन संस्कारांची एक पावतीच होती.
माझ्या इतर विषयांमध्ये ‘जिओग्राफी’ हाही एक विषय होता. आर. डी. पाटील सर हा विषय शिकवत असत. नेहमी हसतमुख असणारे हे सर देखणे आणि अतिशय उमद्या स्वभावाचे होते. विद्यार्थ्यांशी ते मित्राप्रमाणे वागत असत.
विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असणारे हे सर कॉलेजमध्ये एक वेगळाच उपक्रम राबवत असत. दरवर्षी ते त्यांच्या ‘जिओग्राफी डिपार्टमेंट’ची खोपोलीजवळच्या एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी ‘पिकनिक’ नेत असत. सहलीला येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी ‘काँट्रीब्युशन’ काढून सहलीचा खर्च करायचा असे.
ही सहल सहसा एखाद्या नदीकिनारी किंवा धरणाजवळ आयोजित केली जात असे.पहाटे लवकर उठून आम्ही सर्व विद्यार्थी सहा-सात वाजण्याच्या सुमारास एस.टी. स्टँडवर जमा होत असू. त्यानंतर सहलीच्या ठिकाणी जाणारी पहिली बस पकडून आम्ही नऊ-दहा वाजेपर्यंत तिथे पोहोचत असू.
सहलीच्या ठिकाणी गेल्यावर विद्यार्थीच, विशेषतः मुली, स्वयंपाक करीत असत. काही विद्यार्थी जळणासाठी लाकूडफाटा गोळा करत असत, काहीजण जवळच्या बाजारातून स्वयंपाकासाठी लागणारं सामान आणत असत, तर काहीजण झाडांच्या पानांच्या पत्रावळ्या तयार करून त्या स्वच्छ धुऊन आणण्याचं काम करत असत.

स्वयंपाकाची भांडी मात्र सर स्वतः घेऊन येत असत. स्वयंपाक झाल्यावर सर्वजण झाडाखाली पंगतीत बसत आणि गप्पा मारत त्या धुरकट वास असलेल्या जेवणाचा मनमुराद आनंद लुटत असत.
जेवण झाल्यावर थोडी विश्रांती घेऊन सर आम्हाला काही ‘टीम बॉण्डिंग’ उपक्रम देत असत. पूर्ण दिवस अतिशय मनोरंजक वातावरणात, हसत-खेळत जात असे. संध्याकाळी सर्व विद्यार्थ्यांना खोपोलीला जाणाऱ्या एस.टी. बसमध्ये बसवून दिल्यानंतरच सर आपल्या घरी जात असत.
‘जिओग्राफी डिपार्टमेंट’चे विद्यार्थी दरवर्षी या सहलीच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असत.
एकदा ‘जिओग्राफी’ विषयाचं लेक्चर सुरू होतं. पाटील सर पृथ्वीच्या वातावरणासंबंधीच्या एका विषयावर शिकवत होते. अचानक सर विद्यार्थ्यांना म्हणाले,
“तुम्हाला मी एक जनरल प्रश्न विचारतो. बघू या, तुमचं सामान्य ज्ञान किती आहे ते.”
“ठीक आहे सर, विचारा!” काहीजण उत्साहाने म्हणाले.
सरांनी प्रश्न विचारला,
“पृथ्वीच्या ओझोन वायूच्या थराला जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कशामुळे झाली आहे?”
सगळेजण त्यांच्या या प्रश्नामुळे संभ्रमात पडले; कारण ‘ओझोन वायू’चा कुठलाही उल्लेख जिओग्राफीच्या अभ्यासक्रमात नव्हता.
एकाने विचारलं,
“सर, हा ओझोन वायू म्हणजे काय?”
सर म्हणाले,
“ओझोन वायूचा थर पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात वरच्या भागात असतो. या थराला पडलेल्या पोकळीमुळे सूर्याची हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणं पृथ्वीवर पोहोचतात. ओझोनचा हा थर त्या किरणांना पृथ्वीवर पडण्यापासून रोखण्याचं काम करतो. तर आता या थरामध्ये पोकळी निर्माण झाली आहे, तर त्याचं कारण काय असावं?”
सरांची माहिती काही अंशी बरोबर होती; पण ती अद्ययावत नव्हती. बाकीचे सर्वजण या विषयाबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होते. त्या वायूबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हती. त्यामुळे वर्गात कुजबुज सुरू झाली.
एकाने आपलं ज्ञान पाजळत उत्तर दिलं,
“सर, एखादं विमान खूप उंच उडून त्या थरामधून गेलं असेल, म्हणून ही पोकळी पडली असावी.”
संपूर्ण वर्गात जोरदार हशा पिकला. सर देखील हसू लागले.
दुसरा एक विद्यार्थी थोडं अधिक वैज्ञानिक उत्तर देण्याच्या प्रयत्नात म्हणाला,
“सर, अमेरिका आणि इतर देश सतत अंतराळात उपग्रह सोडत असतात. त्यांना अंतराळात नेण्यासाठी मोठमोठी रॉकेट्स वापरली जातात. त्या रॉकेट्समधून बाहेर पडणाऱ्या प्रचंड उष्ण धुरामुळे ओझोनच्या थराला भोक पडलं असावं.”
त्या विद्यार्थ्याच्या उत्तरात काहीतरी तथ्य असावं, असं सर्वांना वाटलं. आता सर त्यावर काय म्हणतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
सरांनी त्याला विचारलं,
“हे कुठे वाचलंस तू?”
तो म्हणाला,
“मी कुठे वाचलं नाही, पण मला असं वाटतं.”
सर म्हणाले,
“एखाद्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी काही ठोस पुरावा लागतो. तुमचं उत्तर पूर्णपणे चुकीचं आहे.”
सर्वजण पुन्हा एकमेकांकडे पाहू लागले. सरांनी आता हे मोठं आव्हान वर्गासमोर ठेवलं होतं.
बराच वेळ कोणी उत्तर द्यायला उभं राहत नव्हतं म्हणून मी उत्तर द्यायला उभा राहत असतानाच सर म्हणाले,
“ठीक आहे, मी सांगतो. ओझोनच्या थराला रासायनिक कारखान्यांतून उत्सर्जित होणाऱ्या रासायनिक वायूंमुळे पोकळी निर्माण झाली आहे.”
कोणीतरी विचारलं,
“कोणते वायू, सर?”
सर म्हणाले,
“विशेषतः कार्बन मोनॉक्साइड वायूमुळे पृथ्वीच्या ओझोन थराला पोकळी निर्माण झाली आहे.”
आता मात्र मी हात वर केला.
सर मला म्हणाले,
“हां धनंजय, बोल.”
मी उभा राहून म्हणालो, “सर, पृथ्वीच्या ओझोन वायूच्या थराला कार्बन मोनॉक्साइडमुळे नाही, तर ‘क्लोरोफ्लुरोकार्बन’ या वायूमुळे पोकळी निर्माण झाली आहे.” झालं…! भर वर्गात सरांच्या उत्तरालाच आव्हान दिलं गेलं होतं.

क्षणभर वर्गात कमालीची शांतता पसरली. नंतर सगळेजण कुजबुज करत माझ्याकडे आणि सरांकडे पाहू लागले.
वर्गातील विद्यार्थ्यांना आधीच ‘ओझोन वायू’बद्दल काही माहिती नव्हती आणि त्यात मी ‘क्लोरोफ्लुरोकार्बन’ या नव्या वायूचा उल्लेख करून संपूर्ण वर्गालाच बुचकळ्यात टाकलं होतं.
हा विषय आता त्यांच्या डोक्यावरून चालला होता. सगळे जण प्रेक्षकांसारखे आमच्या दोघांकडे पाहत होते.
पाटील सर हसत मला म्हणाले,
“अरे धनंजय, हे तुला कोणी सांगितलं? आणि हा कुठला नवीन वायू तू शोधून काढला आहेस? कुठे वाचलंस तू हे ?”
त्यावेळी मी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी चालू घडामोडींवर आधारित ‘फ्रंटलाईन’ नावाचं एक सुप्रसिद्ध इंग्रजी मासिक दर महिन्याला वाचत असे. त्याच महिन्याच्या अंकात ‘ओझोन पोकळी’ वर एक विस्तृत लेख प्रकाशित झाला होता आणि तो मी वाचला होता.
योगायोगाने सरांनी त्याच विषयावर प्रश्न विचारला होता.
मी म्हणालो,
“सर, ‘फ्रंटलाईन’ मॅगेझीनमध्ये यावर लेख आला आहे. त्यात या वायूबद्दल माहिती दिली आहे. हा वायू रेफ्रिजरेशन प्रक्रियेमुळे वातावरणात सोडला जातो.”
वर्गात पुन्हा कुजबुज सुरू झाली. क्लोरोफ्लुरोकार्बन काय, फ्रंटलाईन मॅगेझीन काय, रेफ्रिजरेशन काय, सगळंच त्यांच्यासाठी नवीन होतं. सर्वजण पुन्हा माझ्याकडे आणि सरांकडे पाहू लागले.
सरांच्या “रासायनिक कारखान्यांमधून उत्सर्जित होणाऱ्या वायूंमुळे पोकळी निर्माण झाली आहे” या विधानाला छेद देत मी, रेफ्रिजरेशन किंवा शीतकरण प्रक्रियेमुळे हा वायू वातावरणात सोडला जातो, असं नवीन विधान केलं होतं. त्यामुळे सरदेखील क्षणभर संभ्रमात पडले.
सर्वजण आपल्याकडे पाहत आहेत, हे लक्षात येताच सर मला म्हणाले,
“हे कुठलं मॅगेझीन आहे?”
मी उत्तर दिलं,
“सर, चालू घडामोडींवर आधारित हे नवीन मासिक सुरू झालं आहे.”
तेवढ्यात तास संपल्याची बेल झाली. जाता-जाता सर म्हणाले,
“ठीक आहे. उद्या ते मॅगेझीन घेऊन ये. बघूया बरं, त्यात काय लिहिलं आहे.”
बाकीचे विद्यार्थी मात्र, “काय हा एक-एक नवीन शोधून काढतो!” अशा नजरेने माझ्याकडे पाहू लागले.
दुसऱ्या दिवशी मी ते मॅगेझीन कॉलेजमध्ये घेऊन गेलो. वर्गात येताच सरांनी विचारलं,
“काय रे, आणलंस का ते मॅगेझीन?”
मी काल जे काही म्हणालो होतो त्याबद्दल माहिती करून घेण्यास सर देखील अत्यंत उत्सुक होते असे एकंदरीत दिसत होते.
“हो सर, हे पहा,” असं म्हणत मी त्यांच्या टेबलाजवळ जाऊन मासिकातील तो लेख त्यांना दाखवला.
सरांनी मासिक हातात घेऊन त्याची पानं बारकाईने पाहिली. प्रसिद्ध वर्तमानपत्र समूह ‘द हिंदू’ हे मासिक प्रकाशित करत असे.
सरांनी तो लेख वाचला आणि माझ्याशी हस्तांदोलन करत म्हणाले,
“खूपच छान! स्वतःला तू चालू घडामोडींशी अत्यंत चांगल्या प्रकारे अद्ययावत ठेवलं आहेस.”
त्यानंतर त्यांनी मला हे मासिक वाचण्याचं कारण विचारलं. मी त्यांना सांगितलं की, मी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे आणि त्यासाठी चालू घडामोडींवरील हे मासिक अतिशय उपयुक्त आहे.
Top of Form
Bottom of Form
नंतर वर्गातील विद्यार्थ्यांकडे पाहून ते म्हणाले,
“बघा, अभ्यास करावा तर असा! नुसतं ‘सिलॅबस’च्या मागे धावून अभ्यास होत नसतो; ती घोकंपट्टी असते. त्या विषयाचं अवांतर वाचनही असावं, म्हणजे त्या विषयात काय नवीन घडामोडी झाल्या आहेत, कोणते नवे शोध लागले आहेत, हे आपल्याला समजतं. जसं आपल्याला आत्ताच समजलं. खूप छान, धनंजय! कीप इट अप!”
त्या वर्षी मी हिंदी असोसिएशनच्या सर्वाधिक स्पर्धा आयोजित केल्या आणि स्वतःदेखील त्या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेतला. तसेच इतर असोसिएशनच्या स्पर्धांमध्येही सहभागी झालो.
त्या स्पर्धांमध्ये हिंदी असोसिएशनच्या वादविवाद आणि कथा स्पर्धेत मला प्रथम क्रमांक मिळाला, तर ‘इम्प्रोम्प्टू’ भाषण आणि निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला. तसेच मराठी असोसिएशनच्या कथा स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर इंग्लिश आणि जिओग्राफी असोसिएशनच्या ‘क्विझ कॉम्पिटिशन’मध्ये अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिके मिळाली.
या सर्व अनुभवांतून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, वाचन, मेहनत, आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन यांचा संगमच यशाची खरी गुरुकिल्ली असते.

कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात माझ्यावर पारितोषिकांचा अक्षरशः पाऊस पडला. सर्वाधिक पारितोषिकं मीच मिळवली होती. प्राचार्यांच्या हस्ते पारितोषिकं स्वीकारताना त्यांनी माझी पाठ थोपटत म्हटलं,
“शाब्बास धनंजय! सर्वच बाबतीत खूप चांगला परफॉर्मन्स दाखवलास तू.
कीप इट अप!”
हिंदी असोसिएशनतर्फे मला ‘बेस्ट ऑर्गनायझर’चा पुरस्कार मिळाला. असोसिएशनच्या स्पर्धांव्यतिरिक्त मी विविध खेळांमध्येही भाग घेतला होता.
मुंबई विद्यापीठाच्या ‘वेट लिफ्टिंग’ स्पर्धेत आणि कॉलेजच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांतील ‘पॉवर लिफ्टिंग’मध्ये मला अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिकं मिळाली.
कॉलेजच्या क्रिकेट संघातून त्या वर्षीदेखील माझी विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. मी जवळजवळ सर्वच स्पर्धांमध्ये भाग घेऊन पारितोषिकं मिळवली होती. त्यामध्ये मुंबई विद्यापीठ पातळीवरील दोन स्पर्धांचाही समावेश होता.
त्या वर्षी मी विविध स्पर्धांमध्ये एकूण बारा पारितोषिकं मिळवली. कॉलेजमधील विविध क्रीडा स्पर्धा, मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धा आणि इतर असोसिएशनच्या उपक्रमांमध्ये भाग घेऊन सर्वाधिक पारितोषिकं मिळवणारा मी कॉलेजमधला पहिलाच विद्यार्थी ठरलो होतो.
जेव्हा मी ती सर्व ‘सर्टिफिकेट्स’ आणि ‘ट्रॉफीज’ घेऊन घरी गेलो, तेव्हा आई आणि अण्णांना खूप आनंद झाला. वडिलांची खोपोली येथील महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या ‘इंडो-जपानीज ॲग्रीकल्चर इन्स्टिट्यूट’मध्ये प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली होती.

दुसऱ्या दिवशी त्यांनी माझी सर्व सर्टिफिकेट्स आणि ट्रॉफीज त्यांच्या विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी संस्थेत घेऊन गेले. त्यांना माझा खूप अभिमान वाटत होता. त्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ दिला नव्हता; उलट तो अधिकच दृढ केला होता.
कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाची वार्षिक परीक्षा जवळ आली होती. रात्री उशिरापर्यंत जागून मी पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. खेळ, असोसिएशनच्या स्पर्धा आणि विविध कार्यक्रम सांभाळत असतानाही मी अभ्यासाचा ‘ट्रॅक’ कायम ठेवला होता. आता प्रत्येक विषयाची ‘रिव्हिजन’ सुरू केली.
परीक्षा सुरू झाल्या. त्या वर्षातील माझ्या अष्टपैलू कामगिरीमुळे सर्व विषयांच्या प्राध्यापकांचं लक्ष माझ्याकडे वेधलं गेलं होतं. सर्व विषयाच्या परीक्षा व्यवस्थित गेल्या.
काही दिवसांनी निकाल लागला आणि त्या वर्षीदेखील मी कला शाखेच्या वार्षिक परीक्षेत सलग दुसऱ्यांदा ‘फर्स्ट क्लास फर्स्ट’ आलो.
एका वर्षात माझ्यात आमूलाग्र बदल झाला होता. अंतर्मुखी, सतत मागे राहणारा मी आता पूर्णपणे बदललो होतो. अभ्यास, जिम, खेळ आणि विविध स्पर्धा, प्रत्येक क्षेत्रात स्वतःला पुढे ठेवण्याचा मी प्रयत्न केला होता आणि त्यात यशस्वीही झालो होतो.
कॉलेजमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकवर्ग माझी दखल घेऊ लागला होता. माझ्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला होता. याचं संपूर्ण श्रेय हिंदीच्या प्राध्यापिकांना जातं.
त्यांनी मला एकदा सांगितलं होतं,
“इस साल से मैं एक अलग धनंजय को देखना चाहती हूं।”
आणि तसंच घडलं होतं. त्यांनी मला वक्तृत्व, कथालेखन, निबंधलेखन, वादविवाद अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सातत्याने प्रोत्साहित केलं.
ह्या हिंदीच्या प्राध्यापिका अत्यंत प्रतिभावान होत्या. त्या उर्दूमध्ये लघुकथा, कविता, शायरी आणि कथा लिहित असत. त्यांचं हे साहित्य अजूनपर्यंत प्रकाशित झालं नव्हतं. अधूनमधून त्या मला त्यांच्या कथा किंवा कविता वाचायला देत आणि माझा अभिप्राय विचारत.
मी त्यांचं साहित्य वाचून वेळोवेळी माझं मत व्यक्त करत असे. त्या खूप सुंदर लिहित असत. मी त्यांना नेहमी म्हणायचो,
“मॅडम, आप अपना साहित्य प्रकाशित क्यों नहीं करवातीं?”
त्या हसत म्हणत,
“अरे, किसको टाइम है ये सब करने के लिये…?”
त्यावर मी म्हणायचो,
“मॅडम, मैं एक दिन आपका ये साहित्य जरूर छपवाऊँगा। आप एक दिन बहुत बड़ी साहित्यकार बननेवाली हैं।”
अर्थात, त्यांचं साहित्य प्रकाशित करण्याची संधी मला कधी मिळाली नाही.
कॉलेजची पदवी घेतल्यानंतर मी पुण्याला आलो आणि पुढे अनेक वर्ष आमचा संपर्क राहिला नाही. पण माझ्या व्यक्तिमत्त्वात अंतर्बाह्य बदल घडवून आणण्यात त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता.
काही वर्षांनी मी दादरला ‘प्री-एम्प्लॉयमेंट मेडिकल टेस्ट’ साठी गेलो असताना योगायोगाने कॉलेजमधील एक वर्गमैत्रीण फूटपाथवरच्या गर्दीत भेटली. तिच्याकडून मला त्या प्राध्यापिकांचा फोन नंबर मिळाला.
त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की, त्यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त झाली होती. तसेच त्यांच्या काही कविता, कथा आणि शायरी प्रकाशितही झाल्या होत्या. भारतीय उर्दू साहित्यविश्वात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली होती. हे ऐकून मला खूप आनंद झाला.
अलीकडेच भारत सरकारने भारतीय साहित्यातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत त्यांना उर्दू साहित्यातील सर्वोच्च ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ प्रदान केला.
कधीकाळी बोलताना सहज मी त्यांना म्हटलं होतं,
“आप एक दिन बहुत बड़ी साहित्यकार बननेवाली हैं।”
आणि खरंच, त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर ते सत्यात उतरवलं होतं. माझ्या बाबतीत मात्र त्या खऱ्या अर्थाने एक ‘किमयागार’, एक ‘अल्केमिस्ट’ ठरल्या होत्या.
क्रमशः


Very good written..!!