त्यांनी विश्वास न बसलेल्या अवस्थेत त्या व्यक्तीकडे पाहिले आणि म्हणाले,
“बापरे ! अरे मग तिला तुम्ही बाहेर काढले कसे नाही? “
“साहेब, कोणीच मदतीला यायला तयार नाही. घर अर्धे बुडाले आहे. फक्त माडी राहिली आहे. पुराचे पाणी वेगाने घरात घुसले त्यामुळे आम्ही धावत पळत घराबाहेर पळालो. घरापासून लांब आल्यावर आमच्या लक्षात आले कि आमची लहान बहीण आमच्यात नाही आहे. आम्ही घराबाहेर पळालो तेव्हा ती तिच्या बाळाला घेऊन वर माडीवर झोपली होती.”
“अहो, पण नंतर जाऊन तुम्ही तिला घेऊन यायचे ना ? “
“नाही साहेब. घराभोवती पाणी गळ्यापर्यंत आले आहे आणि त्या पाण्यात शिरण्याची मला किवां आमच्या पैकी कोणाला हिम्मत होत नाही. साहेब, मुलीला आणि तिच्या बाळाला वाचवायला आम्हाला मदत करा. “
“अहो पण आम्ही कसे वाचवणार ? तुम्ही पोलिसांना सांगितले का ?”
“साहेब पोलिसांचा पत्ता नाही, इतर लोकांकडे हात पाय जोडून झाले, पण कोणी मदत करायला तयार नाही.” ते कुटुंब गावात नवीन होते. थोरल्या मुलाचा डॉक्टरकीचा व्यवसाय होता. गावात नुकतेच त्यांनी क्लिनिक सुरु केले होते.
विवाद आणखी ताणला जाण्यापूर्वी माझा जिवलग मित्र मधू घरी आला. तो पुराची खबर द्यायला आला होता. तो देखील हे सर्व ऐकून पेचात पडला.
वडील त्याला म्हणाले, “अरे मधू, कोणाला तरी तुमच्या आळीतून घेऊन ये मदत करायला. पण माणूस मात्र पोहणारा बघ.”
मधू बोलला, ” अण्णा, कोणीही यायला तयार होणार नाही. पुराच्या पाण्यात कोणी जाणार नाही.”
“साहेब, लवकर काहीतरी करा नाहीतर मुलगी नातवासकट हातची जाईल.” कुटुंब प्रमुख काकुळतीने विनंती करू लागले.
“तुमच्या मुलाला मदतीला पाठवला तर बरं होईल.”
क्षणार्धात तिथे एक अस्वस्थ शांतता पसरली. वडील काहीसा संयम बाळगून म्हणाले,
“अहो ते कसं शक्य आहे.?” मी माझ्या मुलाचा जीव धोक्यात कसा घालू..? तुम्ही तुमच्या बहिणीला पुराच्या पाण्यात सोडून कसे काय आलात..?
वडील काहीसे चिडले होते. कारण तो माणूस स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात न घालता दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालत होता. खरं पाहता आत्तापर्यंत मी ज्येष्ठांच्या चर्चेत एक शब्दही बोलला नव्हता, पण जेव्हा मधूसोबत त्याचं मत विचारलं गेलं, तेव्हा, कुठून हिम्मत आली हे पूर्णपणे समजून न घेताच, मी बोललो,
“अण्णा, मी मधू बरोबर जाऊन बघू का काय करता येईल ते ?”
मी त्या वेळी कॉलेज च्या पहिल्या वर्षाला होतो. खेळ, व्यायाम नियमित असल्यामुळे अंगापिडाने थोडा थोराड होतो. उंची पण बऱ्यापैकी होती. म्हणून कदाचित त्या कुटुंबप्रमुखाने माझ्याबाबतीत विचारणा केली होती.
शेवटी वडिलांचा नाईलाज झाला.
“ठीक आहे , सांभाळून जा. मधू जरा ह्याच्याकडे लक्ष ठेव.”
तेवढ्यात आई बोलली, “त्याला कशाला पाठवता ? उगाच काही झाले तर ? एकतर एकुलता एक आहे. दुसऱ्या कोणाला जायला सांगा बरें “
आईला मी म्हणालो, ” आई, मी काही पाण्यात उतरणार नाही. त्यांना तिथे काही मदत मिळते का ते बघतो. तू अजिबात काळजी करू नकोस.”
पावसाचा जोर आता थोडा कमी झाल्या सारखा वाटत होता. घराबाहेर पडल्यानंतर पावसाने बाहेर किती मोठा हाहाकार माजवलेला आहे ह्याचं प्रत्यंतर आलं. पुराचे पाणी आमच्या परिसरात जरी आले नव्हते तरी नुकसान बरेच झाले होते. गावातील बहुतेक घरं कौलारू होती त्यामुळे अनेक घरांची काही कौले सोसाटयाच्या वाऱ्याने उडाली होती, काही घरांचे पत्रे उडाले होते, रस्त्यांवर, अंगणात नारळी, पोफळी, आंब्याची झाडे उन्मळून पडली होती. रस्त्यावर पडलेल्या झाडांतून आम्ही वाट काढीत चाललो होतो.
काही वेळाने आम्ही त्या घराजवळ पोहचलो आणि स्तंभितच झालो.
ते घर एकमजली होते आणि अर्धे पाण्यात बुडाले होते. त्या वस्तीच्या समोर असलेल्या रस्त्यावर साडे चार ते पाच फूट पाणी पाणी होते. पाण्याला हलकासा प्रवाह होता आणि त्यामधून काही घरगुती सामान वाहून चालले होते. पाणी अत्यंत घाणेरडे होते. पुराच्या पाण्याने गावातील सगळी घाण बाहेर काढली होती. घराचा बराचसा भाग हा लाकडी होता. घराच्या ओसरीचे प्रवेश द्वार सताड उघडे होते. तसेच आतील मुख्य दार देखील सताड उघडे होते. घरातील लोकांनी दाराला काडी न लावताच जीव मुठीत धरून पलायन केले होते. पुराच्या पाण्याने त्यांना तेवढी उसंत दिली नव्हती असे दिसत होते. त्या घाई गडबडीतच ते माडीवर झोपलेल्या त्यांच्या बहिणीला विसरले होते. ओसरीला लाकडाच्या पट्ट्या मारलेल्या होत्या. आणि ओसरीतूनच वरच्या मजल्यावर जाण्याचा लाकडी जिना होता आणि तो पुराच्या पाण्याने अर्धा बुडाला होता. त्या वरच्या मजल्याच्या सज्ज्यामध्ये एक स्त्री तिच्या बाळाला घेऊन मदतीसाठी आक्रोश करीत उभी होती.
परिसरातील सर्व घरे अर्धी पाण्याखाली बुडालेली होती. बरीच लोकं लांब उभे राहून आपापल्या घरांकडे बघत होती. त्या वस्तीमध्ये घरात अडकलेली एकच व्यक्ती म्हणजे त्या कुटुंबप्रमुखाची मुलगी व तिचे बाळ.
आम्हाला पाहताच त्या स्त्रीने तिच्या भावाला हाक मारायला सुरवात केली.
” दादा, मला लवकर बाहेर काढा. हे घर पडेल, लवकर बाहेर काढा” असे ती सारखी म्हणत होती.
घरापासून ते आम्ही उभ्या असलेल्या जागेमधील अंतर हे जवळ जवळ शंभर फूट होते आणि हा सर्व भाग पाण्याने व्यापला होता. घरासमोरून गेलेला रास्ता हा पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. तसेच रस्त्याच्या बाजूने असलेले गटार, नाले सगळे एकजीव झाल्यामुळे कुठे गटार, नाला आहे आणि कुठे रस्ता आहे ह्याचा काहीच अंदाज येत नव्हता आणि त्यामुळेच लोक त्या स्त्रीच्या मदतीला जाण्याचे धाडस करत नव्हते.
एव्हाना पाऊस परत सुरु झाला होता. पाणी परत वाढण्याची शक्यता होती आणि तशा परिस्थिती मध्ये ती स्त्री किती काळ तग धरून राहील ह्याची शाश्वती नव्हती.
पाणी वाढू लागले होते. घराच्या ओसरीच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या तुळईचा पाण्याच्या पातळी पासूनचा अंदाजे तीन फूट भाग मोकळा होता. माडीवर जाणारा अर्धा जिना त्याच पातळीपर्यंत पाण्यात बुडाला होता.
आम्ही एका दोघांना विचारून होडीची सोय होते का ते विचारून पहिले पण कोळीवाड्यातील बहुतेक होड्या वाहून गेल्या होत्या आणि उरलेल्या होड्या कोळीवाड्यातील अडकलेली माणसे काढण्यात गुंतल्या होत्या. तसेच कोणी पोहणारा माणूस त्या स्त्रीला आणि तिच्या बाळाला बाहेर काढायला मदत करेल का ह्याची देखील आम्ही जमलेल्या लोकांकडे विचारपूस करून मदत मिळवायचा प्रयत्न केला पण त्या पाण्यात जायला कोणीच तयार होत नव्हते.
“अरे बाबा, कोण उतरेल ह्या पाण्यात आता? प्रत्येकाला आपला जीव प्यारा आहे कि नाही ?”
ते लोकं तिच्या भावाकडे हात करून म्हणाले. “हा तिला आणि तिच्या बाळाला टाकून आपला जीव वाचवण्यासाठी पळाला, आता स्वतः देखील पाण्यात उतरत नाही आहे. म्हणजे आपला जीव सांभाळून दुसऱ्याचा जीव धोक्यात घालायचा. कमाल आहे ह्या माणसाची..!!” सगळे लोक त्या मुलीच्या भावावर चिडले होते.
आता त्या स्त्रीचा धीर सुटत चालल्याचे दिसत होते. तिचं रडणं काही थांबत नव्हतं आणि जोडीला आता तिचं बाळ देखील रडायला लागले होतं. त्या मुलीचा तो मोठा भाऊ लोकांकडे मदतीची मनधरणी करत होता पण स्वतः काही पाण्यात उतरत नव्हता ह्याचं मला आणि मधूला आश्चर्य वाटत होतं.
त्या वाहत्या पाण्याकडे मी एक दृष्टिक्षेप टाकला. पाण्याला प्रवाह होता. त्या प्रवाहात बऱ्याच वस्तू हळूहळू वाहत जात होत्या. त्यावरून प्रवाहाच्या वेगाचा अंदाज येत होता. क्षणभर विचार करून मी एकदा त्या सर्वांकडे पहिले आणि मधू ला सांगितले,
‘मी जाऊ का ?”
मधू म्हणाला, “अरे पण तुला पोहता कुठे येतंय. काही झालं तर ..?”
मी त्याला म्हणालो, “बघू काय होते ते.”
पाण्याची मला पहिल्या पासून भीती वाटत आली होती आणि त्यामुळेच कदाचित मी पोहण्यापासून लांब राहिलो होतो. आणि आता पुराच्या पाण्यात उतरण्याचे हे अवसान, ते पण रस्ता, नाले, गटार पाण्याखाली गेले असतांना आणि पाण्याच्या खोलीचा काहीच अंदाज नसताना, मी कुठून जमवले ते मलाच माहित नव्हते. पाण्यात उतरत असताना मी प्रभू येशूची प्रार्थना केली आणि साहाय्य मागितले.
अठरा-एकोणीस वय असलेला मी पाण्यात उतरलो तेव्हा माझ्या हातात आधाराला काहीच नव्हते. थंडगार पाण्याची शिरशिरी सर्व अंगभर सरसरत गेली. पाण्याच्या खोलीचा काहीच अंदाज नसल्या मुळे पायाने चाचपत चाचपत मी हळू हळू पुढे जात होतो. मी पाण्यात उतरलेला बघताच त्या स्त्रीचे रडणे थांबले होते आणि ती मोठ्या आशेने आता माझ्या कडे बघायला लागली होती.
पावसाचा जोर वाढायला लागला होता. एका बाजून येणारे पाणी मला ढकलत होते आणि त्यामुळे मला तोल सावरायला अत्यंत कठीण जात होते. डोक्यावरून चेहऱ्यावर ओघळणारे पाणी एका हाताने पुसत मी हळू हळू मार्ग क्रमित होतो. खरं पाहता मला चालण्याचा वेग वाढवायला पाहिजे होता कारण जर का पाण्याची पातळी आणि प्रवाह वाढला असता तर घरात प्रवेशाचा मार्ग बंद झाला असता. पण पाण्याच्या प्रवाहामुळे आणि बुडालेल्या रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे ते शक्य नव्हते.
मी आता प्रवाहाच्या मध्यभागी पोहचलो होतो. मी माझे लक्ष घराच्या प्रवेश दारावर केंद्रित केले होते. अंदाज बांधला तर रस्ता घरासमोरून जात होता. मला असे वाटत होते कि मी आता रस्त्याच्या मध्यभागी उभा आहे. परंतु घर आणि रस्ता ह्यामध्ये जर नाला किंवा गटार असेल तर त्याची मला मुळीच कल्पना नव्हती. येथे पाणी छाती पर्यंत आले होते आणि चालायला पाय उचलला कि शरीराला हलके करत होते. त्यामुळे स्वतःला सावरत अत्यंत बिकट परिस्थित मी त्या वाहत्या पाण्यातून पुढे जात होतो. प्रवाहात लाकडे, डबे आणि इतर बऱ्याच वस्तू वाहून येत होत्या. पाण्याच्या प्रवाहामुळे जमिनीवरून पाय घसरत होते.
ओसरीच्या दारापाशी पोहचण्यास मला वीस ते पंचवीस मिनिटे लागली असतील. दारापाशी पाणी छाती पर्यंतच होते. समोरून त्या घराची पाण्यात बुडालेली दर्शनी खोली दिसत होती. टीव्ही , कपाटे, पलंग जे काही असेल ते सर्वकाही पाण्याखाली होते.
उजवीकडे वळून मी पाण्यात अर्धवट बुडालेला जिना चढायला सुरवात केली आणि पहिल्याच पायरीवरून माझा पाय घसरला.
