काळरात्र | भाग – 4

5b83f565 bd8b 4e9f addd b41f7d7776b8

This post's average rating is: 5

नंतर काही दिवस ते कुटुंब आमच्या घरी राहून पूर ओसरल्यानंतर आपल्या गावाला गेले. पुराने गावाची दैना उडवली होती. संपूर्ण बाजारपेठ आणि अर्धा गाव दोन-तीन दिवस पाण्याखाली होता. ओळखीचे बरेच लोक बुडून मरण पावले होते. काहीजणाना पाणी अचानक घरात शिरल्यामुळे घराबाहेर पडता आले नव्हते. त्यांनी पोटमाळ्यावर आश्रय घेण्याचा प्रयत्न केला होता. पण पूर एवढा प्रचंड होता कि पुराच्या पाण्याने गावातील अर्धी घरे बुडवून टाकली होती. त्यामुळे संपूर्ण घर पाण्याखाली गेल्यामुळे आणि पोटमाळ्यावरुन बाहेर पडता न आल्यामुळे बरेच लोक घरातच अडकून मरण पावले. त्यांचे मृतदेह पोटमाळ्यावरच पडून राहिले होते.

त्या रात्री संपूर्ण कोकण किनारपट्टीवर अभूतपूर्व आणि विक्रमी पाऊस कोसळला. २३ जुलैच्या संध्याकाळी आलेल्या भरतीमुळे पाली आणि नागोठणे परिसरातील पूरस्थिती अधिकच भीषण झाली. यामुळे बॅकवॉटरचा परिणाम निर्माण झाला आणि सावित्री नदी, गांधारी नदी आणि अंबा नदी यांसारख्या नद्यांचे पाणी समुद्रात मोकळेपणाने जाऊ शकले नाही.

अंबा नदी सर्वाधिक प्रभावित झालेल्या नद्यांपैकी एक होती. ती खोपोलीहून पाली, जांभुळपाडा, वाकण आणि नागोठणे मार्गे पुढे पोयनाड व वडखळ येथून वाहत जाऊन शेवटी धरमतर खाडी येथे मिळते. दरम्यान, महाडजवळ सावित्री नदी, गांधारी नदी, काल नदी आणि नागेश्वरी नदी या नद्यांचा संगम झाल्याने मोठा अडथळा निर्माण झाला. सह्याद्री पर्वतरांगांतून प्रचंड वेगाने खाली उतरलेले पाणी जवळजवळ एकाच वेळी सखल भागात पोहोचल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली.

पाण्याचा प्रचंड लोट नद्यांमध्ये शिरताच एक भिंतीसारखी लाट पाली, जांभुळपाडा आणि वाकणकडे धावून आली. पाली गाव नदीपासून थोडे दूर असल्याने तेथे तुलनेने कमी नुकसान झाले. मात्र जांभुळपाडा गाव पूर्णपणे पुराच्या विळख्यात सापडले. मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या पाण्याच्या तडाख्याने संपूर्ण गाव पाण्याखाली गेले आणि उद्ध्वस्त झाले. केवळ नशिबाच्या जोरावर फार थोडे लोक बचावले. जांभुळपाडा गाव अक्षरशः नष्ट झाले.

आमच्या शेजारी त्या गावातले एक निवृत्त शिक्षक राहत होते. जांभूळपाड्याला त्यांच्या घराचे डागडुजीचे काम चालू असल्यामुळे आमच्या शेजारचे घर त्यांनी भाड्याने घेतले होते. त्यांची नातवंडे सुट्टीला गावी आल्यानंतर ते त्यांना नागोठण्याला घेऊन येत. कारण जांभूळपाड्याला बहुतेक आदिवासी वस्ती होती. त्यामुळे त्या मुलांना तिकडे करमत नसे. मुलांना आई-वडील नव्हते. आजोबा आणि आजीच त्यांचा सांभाळ करीत होते. दुर्दैवाने त्या दिवशी ते वृद्ध जोडपे जांभूळपाड्याला त्यांच्या घरी गेले होते त्यानंतर ते परत कधी दिसले नाहीत.

नागोठणे गावाला लागून असलेल्या मुंबई -गोवा द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूंनी लांबच लांब रांग लागली होती. वाकण ह्या ठिकाणी असलेल्या पुलावरून नदीचे पाणी रात्री वाहू लागले होते. पुराच्या पाण्याची रोरावत आलेली भिंत ह्या पुलावर आदळली. पाणी पुलाच्या दोन्ही बाजूला वेगाने पसरून वाहू लागले. पाण्याचा जोर एवढा प्रचंड होता कि पुलाच्या दोन्ही बाजूला उभी असलेली वाहने एका तडाख्यात वाहून गेली. त्यात कोंकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या कित्येक एस.टी. बसेस होत्या. प्रचंड मनुष्यहानी झाली. पूर ओसरल्यानंतर कित्येक वाहने नदी पात्रात अडकून पडलेली सापडली. आत अडकलेले मृतदेह ओळखण्यापलीकडे गेले होते.

संपूर्ण गाव आणि परिसर उध्वस्त झाला होता. बहुतेक लोक गाव सोडून निघाले होते कारण गाव राहण्यालायक राहिला नव्हता. सर्वत्र चिखल, दुर्गंधी, रोगराईचे साम्राज्य पसरले होते. गावात वीजपुरवठा सुरळीत व्हायला एक महिना गेला

दोन दिवसांनी आमचा मामा मुंबईहुन एक कार घेऊन आला. येताना तो बरेच किराणा सामान, बिस्किटे,  काकड्या , ईत्यादी खाण्याजोगे मिळेल ते सामान घेऊन आला होता. बरेच ठिकाणी महामार्गावर पाणी होते. त्याला नागोठण्या पर्यंत पोहचायला खूपच त्रास झाला होता. त्याच्या मदतीचा आम्हा सर्वाना खूपच उपयोग झाला.

आम्ही पण ते गाव सोडण्याचा निर्णय घेतला. वडिलांनी त्यांच्या ओळखीने पेण वरून एक टेम्पो मागवला. त्यात घरातील सर्व सामान घेऊन आम्ही गाव सोडला आणि खोपोलीला राहायला गेलो. तिथे वडिलांना अत्यंत प्रशस्थ असा सरकारी बंगला दिला गेला होता.

नागोठणे गावाचे पुनर्वसन व्हायला दोन वर्षे गेली. गाव नव्याने वसवला गेला. आमच्या आसऱ्याला आलेल्या त्या कुटुंबाची परत कधी भेट झाली नाही ना त्यांनी कधी आमची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला.

त्या गावातील सर्वांच्याच जीवनाला नवीन कलाटणी मिळाली होती. पोहता न येऊन सुद्धा जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यात मी केलेले ते धाडस, त्या बाळाची आणि त्याच्या आईची केलेली सुटका सगळंच अनपेक्षित होतं. परिणामाची पर्वा न करता अगदी ऐनवेळी मी घेतलेला तो निर्णय एका कुटुंबाला संकटातून बाहेर काढण्यास कारणीभूत ठरला होता. त्या सर्व प्रसंगातून जात असताना माझ्यात देखील काही बदल झाला. निसर्गाचे रौद्र स्वरूप मी फार जवळून बघितले होते. मानवी जीवन हे निसर्गापुढे किती कःपदार्थ आहे ह्याची जाणीव झाली होती. माझ्या व्यक्तिमत्वाला एकप्रकारे अंतर्मुखता आली होती.

ह्या पुराच्या प्रकोपामुळे माझे कॉलेजचे एक वर्ष वाया गेले. मी खोपोलीला नव्याने कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. सर्व काही विसरून मी माझ्या नवीन कॉलेजच्या जीवनाला सुरवात केली.

पण त्यानंतर काही रात्री… ती नदी माझ्या स्वप्नांमधून वाहत होती.

1 thought on “काळरात्र | भाग – 4”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *