प्रभातपर्व

Dawn of an Era

खोपोलीला आम्ही शिळफाट्याला राहत होतो. शिळफाटा ते खोपोली गाव हे साधारण चार-पाच किलोमीटरचे अंतर होते. कॉलेजला बसनेच जावे लागे. कॉलेज सुरू होऊन तीन महिने झाले होते.

प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेलो. तेथील वातावरण पाहून माझा जीव दडपला. बहुतेक सर्व विद्यार्थी जीन्स, शर्ट आणि स्पोर्ट्स शूज अशा पेहरावात होते.

आणि मी?

पॅरागॉनची निळी स्लीपर, जुनी पँट आणि शर्ट अशा पेहरावात मी कॉलेजला गेलो होतो. हातात एकच नोटबुक होते. बाकीच्या विद्यार्थ्यांकडे सॅक होत्या. मला खूप अवघडल्यासारखे झाले.

बी.ए. प्रथम वर्षाचा वर्ग शोधत शोधत शेवटी मी वर्गात पोहोचलो. तास सुरू होता. प्राध्यापकांना विचारून मी आत गेलो. मागच्या बेंचवर माझ्यासारखाच साधा पेहराव केलेला एक मुलगा बसलेला होता. त्याच्या जवळ जाऊन बसलो. सरांनी माझी ओळख विचारली. उशिरा प्रवेशाचे कारणही विचारले. मी नागोठण्याच्या पुराची आणि खोपोलीला केलेल्या स्थलांतराची हकीकत सांगितली. सरांनी सहानुभूती दर्शवून मला बसायला सांगितले.

एक दिवस आमच्या कॉलेजचा यू.आर. माझ्याकडे आला आणि म्हणाला,

“तू शूज घालून का येत नाहीस कॉलेजला?”

“माझ्याकडे नाहीत. का? काय झाले?”

“अरे, काहीजण विचारत होते, ‘त्याच्याकडे शूज नाहीत का’ म्हणून.”

“पण माझ्याबद्दलच का विचारपूस करत आहेत? बरेच विद्यार्थी शूज घालून येत नाहीत.”

“ते काही मला माहीत नाही. तुझ्याबद्दल विचारले म्हणून तुला सांगितले. जरा टापटिपीने येत जा ना कॉलेजला.”

“ठीक आहे,” मी म्हणालो.

मी ठरवले होते की आता अण्णांकडे कपडे, शूज काहीही मागायचे नाही. जे काही आहे त्यातच भागवायचे. त्यांना अजून कसला ताण द्यायचा नाही. त्यांनी माझी बी.ए. प्रवेशाची इच्छा पूर्ण केली होती. माझा अलीकडील ‘रेकॉर्ड’ पाहता त्यांनी मला पुन्हा एकदा कॉलेजमध्ये प्रवेश देऊन एक प्रकारे जुगारच खेळला होता. आता त्या संधीचे सोने करण्याची जबाबदारी माझी होती. कपडे-शूज माझ्यासाठी नगण्य होते.

बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मी कॉलेजला नियमित जाऊ लागलो. ‘ऍडमिशन’ उशिरा झाले होते आणि सगळ्याच विषयांचा ‘पोर्शन’ माझ्यासाठी खूप मागे पडला होता. एक-दोन मुलांकडून त्यांच्या नोट्स घेऊन मी राहिलेला पोर्शन उतरवून घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली.

कॉलेजमध्ये सहविद्यार्थ्यांबरोबर माझी हळूहळू ओळख वाढू लागली. काही मित्रांच्या ओळखीने मी जिमला जाऊ लागलो. सगळी निराशा, आतला राग आणि अस्वस्थता मी लोखंडी वजनांवर काढू लागलो. दररोज दोन-दोन तास व्यायाम करत मी स्वतःला पुन्हा घडवू लागलो.

वर्गामध्ये मी नेहमी शेवटच्या बेंचवर बसायचो. कॉलेजमध्ये ‘एक्स्ट्राकरिक्युलर ऍक्टिव्हिटीज’ भरपूर होत्या. प्रत्येक ‘डिपार्टमेंट’चे स्वतंत्र ‘असोसिएशन’ होते. इंग्लिश असोसिएशन, हिंदी असोसिएशन, मराठी असोसिएशन इत्यादी. ही असोसिएशन्स अभ्यासाव्यतिरिक्त विविध उपक्रम राबवत असत. त्यामध्ये कथा लेखन, कविता लेखन, निबंध लेखन, जनरल नॉलेज, गायन स्पर्धा, भाषण स्पर्धा असे अनेक कार्यक्रम होत असत.

स्पर्धेत प्रथम तीन विजेत्यांची नावे त्या त्या असोसिएशनच्या बोर्डवर मोठ्या अक्षरांत झळकत असत. अशा स्पर्धांचे निकाल तिन्ही असोसिएशनचे ‘डिपार्टमेंट हेड’ एकत्र येऊन विचारविनिमय करून ठरवत असत.

त्या स्पर्धांमध्ये माझ्या वर्गातला रविंद्र नावाचा एक विद्यार्थी नेहमी भाग घेऊन पारितोषिके मिळवत असे. अभ्यासातही तो हुशार होता. पहिल्या टर्ममध्ये त्याने वर्गात पहिला क्रमांक मिळवला होता. बारावीतही तो ‘क्लास टॉपर’ होता. हिंदी आणि मराठी असोसिएशनचे कार्यक्रम तोच पुढाकार घेऊन पार पाडत असे.

क्रिकेटशिवाय मी कधी अशा स्पर्धांमध्ये भाग घेतला नव्हता. त्यामुळे त्या असोसिएशन्सच्या स्पर्धांपासून मी दूरच राहत होतो. क्रिकेट माझं ‘पॅशन’ असल्यामुळे मी कॉलेजच्या ‘सिलेक्शन कमिटी’ला माझ्या खेळाने प्रभावित करून कॉलेजच्या टीममध्ये ‘ओपनिंग बॅट्समन’ म्हणून प्रवेश मिळवला होता.

क्रिकेटसाठी ‘स्पेशल शूज’ आवश्यक होते. अण्णांकडे न मागता मी हळूच आईला त्याबद्दल सांगितले. तिने मला तिच्याकडचे काही पैसे दिले आणि त्यातून मी क्रिकेटचे स्पेशल शूज घेतले. क्रिकेटचा ‘फ्लॅनेल’ मला कॉलेजकडून मिळाला होता; त्यामध्ये ट्रॅक पँट आणि टी-शर्टचा समावेश होता.

मुंबई विद्यापीठाअंतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी आम्ही मुंबईला गेलो. या स्पर्धेत आमच्या कॉलेजने आतापर्यंत एकही सामना जिंकला नव्हता. आझाद मैदानावर आमचा पहिला सामना ठाण्याच्या बेडेकर कॉलेजबरोबर होता.

सामना तीस षटकांचा होता. मी ‘ओपनिंगला’ येऊन चाळीस धावा केल्या. आमच्या संघाने एकूण एकशे तीस धावा केल्या आणि त्यामध्ये सर्वाधिक धावा माझ्याच होत्या. गोलंदाजीमध्ये मी दोन गडी बाद केले. बेडेकर कॉलेजचा संघ आम्ही नव्वद धावांवर गुंडाळला आणि सामना जिंकला.

मुंबई विद्यापीठाअंतर्गत होणाऱ्या या स्पर्धेच्या साखळी सामन्यात आमच्या कॉलेजने पहिल्यांदाच विजय मिळवला होता. मला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले. कॉलेजमध्ये या सामन्याबद्दल खूप गाजावाजा झाला, कारण मुंबई विद्यापीठाच्या क्रिकेट स्पर्धेत कॉलेजचा हा पहिलाच विजय होता. एका विशेष समारंभात कॉलेजच्या ट्रस्टींकडून आमचा सत्कार करण्यात आला.

दुसऱ्या साखळी सामन्यात आमचा सामना उल्हासनगर कॉलेजबरोबर होता. मी पंचावन्न धावा केल्या. आम्ही उल्हासनगर कॉलेजला एकशे साठ धावांचे आव्हान दिले. उल्हासनगर कॉलेजने मात्र चांगला खेळ करून आम्हाला केवळ एक गडी राखून पराभूत केले. आम्ही विजय शेवटच्या षटकापर्यंत खेचून आणला होता; पण दुर्दैवाने आम्हाला हार पत्करावी लागली आणि आम्ही स्पर्धेबाहेर पडलो.

क्रिकेट व्यतिरिक्त कॉलेजच्या ‘वेटलिफ्टिंग’ स्पर्धेतही मी भाग घेतला आणि तिसरा क्रमांक मिळवला. मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःला घडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होतो. मैदानावर, जिममध्ये आणि अभ्यासात, सर्वच ठिकाणी मी स्वतःला नव्याने आकार देत होतो. त्यात मला हळूहळू यश मिळू लागले होते, आणि त्याचेच मला मनापासून समाधान वाटत होते.

मागच्या बाकावर बसणारा, स्लीपर घालून कॉलेजला येणारा तो मुलगा आता हळूहळू स्वतःची ओळख निर्माण करू लागला होता.

अभ्यासाचा माझा मागे पडलेला ‘पोर्शन’ मी आता भरून काढला होता. ‘सोशिओलॉजी’ या विषयाचे मी येण्याअगोदर फक्त एक-दोनच लेक्चर्स झाले होते. त्यानंतर मात्र त्या विषयाच्या प्रोफेसरांनी बरेच महिने लेक्चर्स घेतले नव्हते. त्या दिवशीही त्या विषयाचा तास झाला नाही. हे महाशय रोज कॉलेजला येत असत; पण लेक्चर घेत नसत.

आम्ही तिघे-चौघे याच विषयावर चर्चा करत असताना हिंदी विषय शिकवणाऱ्या प्राध्यापिका तिकडे आल्या आणि मला म्हणाल्या,

“तुम कॉलेज में नया ऍडमिशन हो क्या? तुमने हिंदी सब्जेक्ट क्यों नहीं लिया फर्स्ट इयर के लिए?”

 “मॅडम, ऍडमिशन लेते समय मुझे आयडिया नहीं था कि कौनसा सब्जेक्ट लेना है. थोड़ी जल्दबाज़ी में ले लिया.”

“तो अभी भी सब्जेक्ट चेंज कर सकते हो.”

नंतर त्या माझ्याबरोबर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना म्हणाल्या,

“अरे इसको बोलो, हिंदी सब्जेक्ट लेने के लिये”

“देखता हूँ,” मी म्हणालो.

त्या तेथून निघून जाताच, एकजण मला म्हणाला,

“मॅडम एवढे म्हणत आहेत तर घे ना हिंदी सब्जेक्ट.”

“अरे, ऍडमिशन घेताना घाई झाली होती आणि पुढे मला एम.पी.एस.सी. परीक्षा द्यायची आहे. त्याचा अभ्यास मला आत्ताच कव्हर करायचा आहे म्हणून जिओग्राफी आणि सोशिओलॉजी हे विषय घेतलेत. हिंदी घेऊन मी काय करू?”

 

दुसऱ्या दिवशी एका विद्यार्थ्याने त्या प्राध्यापिकांकडे जाऊन सांगितले,

“वो आपके सब्जेक्ट की बदनामी कर रहा है. सबको बोलता है कि हिंदी बेकार सब्जेक्ट है.”

दुसऱ्या दिवशी त्या प्राध्यापिकेनी मला स्टाफ रूममध्ये बोलावले. तो त्यांचा मोकळा तास होता आणि त्या तिथे एकट्याच होत्या.

मला पाहताच त्या म्हणाल्या,

“तुमको मेरे सब्जेक्ट से कुछ प्रॉब्लेम है क्या?”

“ऐसा कुछ नहीं है, मॅडम.”

“तुम मेरे सब्जेक्ट की बदनामी कर रहे हो. सबको बोलते फिर रहे हो कि हिंदी बेकार सब्जेक्ट है, उसमें कोई स्कोप नहीं है वगैरे…”

मी म्हणालो,

“मॅडम, हम दोस्तों में बात हो रही थी. मैंने सिर्फ इतना कहा था कि मुझे यूपीएससी और एमपीएससी की तैयारी के लिए इंग्लिश और सोशिओलॉजी सब्जेक्ट जरूरी है. हिंदी इतना ज़रूरी नहीं है.”

त्यानंतर त्यांनी मला खूप सुनावलं. मी खाली मान घालून त्यांची ‘फायरिंग’ ऐकत होतो. त्या विद्यार्थ्यांशी झालेल्या त्या संभाषणानंतर मी हिंदी विषयासंदर्भात इतर कोणाशी काहीच बोललो नव्हतो आणि तो विषय तिथेच संपला होता; पण त्यातील एकाने तिखट मीठ लाऊन त्या प्राध्यापिकेना माझ्याबद्दल वेगळेच सांगितले होते. हे सगळं आग लावण्याचं काम कोणी केलं होतं, ते मला नंतर समजलं. अर्थात त्या व्यक्तीपासून जरा सांभाळून राहायचं, असं मी मनाशी ठरवलं.

‘सोशिओलॉजी’ हा विषय एम.पी.एस.सी. आणि यू.पी.एस.सी.साठी महत्त्वाचा असल्यामुळे मी तो घेतला होता. कॉलेजच्या पहिल्या वर्षाची वार्षिक परीक्षा एक महिन्यावर येऊन ठेपली होती. लायब्ररीतून त्या विषयाचे पुस्तक घेऊन मी अभ्यास सुरू केला होता; कारण त्या विषयाच्या प्राध्यापकांचे कोणतेही मार्गदर्शन अजून आम्हाला मिळाले नव्हते.

ते प्राध्यापक रोज स्टाफरूममध्ये येत असत; पण लेक्चर घेत नसत. एक-दोघांनी त्यांना तशी विनंतीही केली होती, पण ते त्याकडे दुर्लक्ष करत होते. हा विषय प्राचार्यांकडे घेऊन जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. कारण जर हे त्या प्राध्यापकांना समजले, तर ते नापास करतील अशी सगळ्यांना भीती वाटत होती.

एके दिवशी त्यांचा तास होता; पण प्राध्यापकसाहेब स्टाफरूममध्ये बसून तंबाखू मळत गप्पा मारत होते. आम्ही सहा-सात जण वर्गात त्यांची वाट पाहत बसलो होतो.

एकजण मला म्हणाला,
“तू जाऊन सरांना विचार ना, ते लेक्चर घेणार आहेत का?”

“नको यार, वैतागले माझ्यावर तर? तू का जात नाहीस ?”

“अरे मी एकदा विचारलेले त्यांना, तर ओरडला माझ्यावर.”

“मग आता काय माझ्यावर ओरडायला पाठवतोस का मला त्यांच्याकडे?”

“तसं नाही, तू नवीन आहेस ना त्यामुळे कदाचित तुझ्यावर ओरडणार नाहीत. म्हणून म्हटले एकदा विचारून तर बघ.”

हो-नाही करता करता मी उठलो. कारण आम्हाला त्या विषयाच्या लेक्चरची खूप गरज होती आणि त्या विषयाचा पोर्शन अजून झालाच नव्हता.

मी स्टाफरूमचे दार ठोठावले आणि आत येऊ का म्हणून विचारले. त्यांनी मला आत बोलावले.

मी म्हणालो,
“सर, आज लेक्चर घेणार आहात का? परीक्षा जवळ आली आहे, म्हणून सगळे विचारत आहेत.”

त्यांनी मला वरखाली पाहिले आणि एकदम आवाज चढवून म्हणाले,

“तू कोण रे मला विचारणारा ‘लेक्चर घ्या’ म्हणून? जास्त शहाणा बनतो आहेस का?”

मी म्हणालो,
“सर, सिलॅबस बाकी आहे. बाकीचे विद्यार्थीही विचारत होते म्हणून तुम्हाला विचारत आहे…”

ते लगेच म्हणाले,

“तुम्हाला स्वतः अभ्यास करता येत नाही का?”

“सर, तसं नाही…”

“तुझी हिम्मत कशी झाली मला लेक्चर घ्या म्हणून विचारायची? जा… नाही घेत लेक्चर. काय करणार आहेस?”

मला काय बोलावे ते सुचेना. स्टाफ रूम मध्ये बसलेले बाकीचे प्राध्यापकही आमच्याकडे पाहत होते.

“सॉरी, सर,” असं म्हणत मी बाहेर पडलो.

खालच्या मानेने मी वर्गात आलो. माझा उतरलेला चेहरा पाहून बाकीचे विचारू लागले,

“काय झालं रे?”

“काही नाही. नंतर लेक्चर घेतो म्हणाले.” मी खोटंच सांगितलं,

“बसा आता बोंबलत…! तो कधी लेक्चर घेईल देव जाणे.”

विनाकारण झालेल्या अपमानाने माझी कानशिलं तापली होती. एवढ्याशा छोट्या गोष्टीवरून त्या माणसाने माझा पाणउतारा केला होता. मी फक्त एवढंच विचारलं होतं, “तुम्ही लेक्चर घेणार आहात का?” पण त्यांना त्यात स्वतःचा अपमान का वाटला, हे मला आजही समजत नाही.

आता मात्र मी सापाच्या शेपटीवर पाय ठेवला होता. ‘सोशिओलॉजी’ या विषयात ते मला नक्की नापास करणार, याची मला जाणीव झाली. वार्षिक परीक्षेत एखादा विषय ठेवून ए.टी.के.टी. घेणं मला परवडणार नव्हतं. अण्णांसमोर मी कधीच उभा राहू शकलो नसतो.

एक-दोन दिवस असेच गेले. त्या प्राध्यापकांशी माझा ‘पंगा’ झाला आहे, हे कॉलेजमध्ये सगळ्यांना समजले. शेवटी मी ‘सोशिओलॉजी’ हा विषय सोडायचे ठरवले.

आता दुसरा विषय कोणता घ्यावा, याचा विचार करू लागलो. तेवढ्यात मला आठवले की हिंदीच्या प्राध्यापिका मला आधी म्हणाल्या होत्या, “माझा सब्जेक्ट का नाही घेतलास?” म्हणून मी त्यांनाच विचारायचे ठरवले; पण त्यांच्या समोर कोणत्या तोंडाने जायचे, हा मोठा प्रश्न होता. कारण कोणीतरी आधीच माझ्याबद्दल त्यांच्या  मनात विष कालवलं होतं आणि त्यासाठी त्यांनी मला चांगलेच सुनावले होते.

पण ‘गरजवंताला अक्कल नसते’ असं म्हणतात. शेवटी मान-अपमान सगळं विसरून मी त्यांना भेटायला गेलो. त्यांचा क्लास सुरू होता, म्हणून कॉरिडॉरमध्ये मी क्लास सुटण्याची वाट पाहत उभा राहिलो.

मनात अनेक विचार येत होते. आता परीक्षेला एकच महिना उरला होता. त्यांनी नाही म्हटलं, तर काही खरं नव्हतं. आणि त्यांनी हो म्हटलं, तरी हिंदीचा पोर्शन एका महिन्यात कसा पूर्ण करणार?

शेवटी क्लास सुटला. वीस-पंचवीस विद्यार्थ्यांनी हा विषय घेतला होता. मी दाराबाहेर घुटमळत उभा असल्याचे पाहून त्यांनी मला आत बोलावले.

त्या टेबलावरची त्यांची पुस्तके आवरून पर्स मध्ये ठेवत होत्या.

“कैसे हो?” माझ्याकडे न बघता त्यांनी मला निर्विकारपणे विचारले.

“ठीक हूँ, मॅडम.”

“बोलो, क्या काम था?” त्यांचा दुसरा एकदम थंड प्रश्न. त्यांना निघायची घाई झाली होती.

त्यांच्या ह्या दोन प्रश्नातच मला त्यांची माझ्या उपस्थितीबद्दलची उदासीनता जाणवू लागली होती. हिंदी विषय घेण्याच्या माझ्या आशा त्यांच्या ह्या दोन प्रश्नातच संपुष्टात येऊ लागल्या होत्या.

मी कसंतरीअडखळत म्हणालो,

“मॅडम, मैं हिंदी सब्जेक्ट लेना चाहता हूँ.”

“अरे वाह! ये अचानक कैसे डिसिजन लिया तुमने?” असे उपरोधपणे विचारून त्यांनी माझ्याकडे न पाहता त्यांची पर्स उचलून चालायला सुरवात केली.

मी त्यांच्यामागून चालत चालत त्यांना विचारले,

‘कुछ हो सकता है क्या, मॅडम?”

“क्यूँ, अभी क्या हुआ? एमपीएससी की तैयारी कैसे करोगे? हिंदी तो तुम्हारे लिए इतना इम्पॉर्टन्ट नहीं था ना?” त्यांनी परत खोचकपणे विचारले आणि चालण्याची गति वाढवली.

मी काहीच बोललो नाही.

कॉलेज सुटले होते. सगळे विद्यार्थी वर्गाबाहेर पडून मेन गेट च्या बाहेर पडत होते. जिन्यावरून आम्ही उतरत असताना त्यांनी विचारले,

“कौन-सा सब्जेक्ट छोड़ रहे हो?”

“सोशिओलॉजी.”

“क्यूँ? वो तो तुम्हारा फेवरेट सब्जेक्ट था कॉम्पिटिटिव्ह एक्झाम के लिए.” त्यांचे वर्मी लागणारे बोलणे अजून संपत नव्हते.

“हाँ … पर कुछ ऐसा हुआ है…”

असे म्हणत जिना उतरत असताना मी त्यांना  सगळी हकीकत सांगितली. त्यांच्या आतापर्यंतच्या एकंदर वर्तणुकीवरून मला टाळण्याचा त्यांचा रोख मला समजला होता. पण मला हा शेवटचा प्रयत्न करायचा होता; नाहीतर ‘सोशिओलॉजी’ मध्ये माझी ‘विकेट’ हमखास उडणार होती हे निश्चित होते.

मी पुन्हा त्यांना विचारले,

‘कुछ हो सकता है क्या, मॅडम?”

बोलता बोलता आम्ही गेटच्या बाहेर येऊन रस्त्याला लागलो.

“एक्झाम को एक महीना भी नहीं बचा है और तुम अभी आए हो. देखना पडेगा.” त्या म्हणाल्या.

“आपसे बहुत उम्मीद है, मॅडम” माझ्या उच्चारात आता याचना स्पष्टपणे दिसू लागली होती.

“मुझे परसों ही इसके बारे में पता चला. स्टाफरूम में सब इसी बारे में बात कर रहे थे. सबका यही कहना है कि इसमें तुम्हारा कोई दोष नहीं है.”

माझी आशा परत उजळली

 “हाँ मॅडम. मैंने ऐसा कुछ भी नहीं कहा जिससे उनको इतना गुस्सा आए.”

त्या थोड्या विचारात पडल्या आणि म्हणाल्या,

“लेकिन एक्झाम को एक महीना भी नहीं बचा है. ऐसे में कॉलेज तुम्हें सब्जेक्ट चेंज करने की परमिशन शायद नहीं देगा. और अगर दे भी दी, तो तुम इतना बड़ा सिलॅबस कैसे पूरा करोगे?”

मी ठामपणे म्हणालो,

“मैं कर लूँगा.”

त्या म्हणाल्या,

“अरे, पागल हो क्या? हिंदी इतना आसान सब्जेक्ट लगता है क्या तुम्हें? मालूम है सिलॅबस कितना है? तीन नॉव्हेल्स हैं और बीस कविताएँ!”

त्यांनी एकामागोमाग एक प्रश्न विचारून माझ्या समोर अडचणींचा डोंगर उभा केला. त्यांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं.

माझी अगतिक अवस्था पाहून त्या शेवटी म्हणाल्या,

“ठीक है. मैं कल प्रिंसिपल से बात करती हूँ. अगर उन्होंने हाँ कहा, तो मैं तुम्हें हिंदी सब्जेक्ट लेने दूँगी.”

“थँक यू, मॅडम!” मी दिलासा मिळाल्यासारखा म्हणालो,

घरी ह्याबाबतीत मी काहीच सांगितले नव्हते. रात्रभर विचार करून मला झोप आली नाही. सकाळ कधी होते ह्याची वाट पाहत मी ती रात्रं जागून काढली.

सकाळी कॉलेजला गेलो. दोन लेक्चर्सनंतर ‘सोशिओलॉजी’चा तास होता, पण तो नेहमीप्रमाणे ‘फ्री’ गेला.

मी हिंदीच्या प्राध्यापिकांना भेटायला त्यांच्या क्लासमध्ये गेलो, पण त्या आल्या नव्हत्या. तेवढ्यात कॉलेजचा शिपाई मला शोधत आमच्या जुन्या बिल्डिंगमध्ये आला आणि सांगितले की प्राचार्यांनी मला बोलावले आहे.

मी प्राचार्यांना भेटायला गेलो. त्यांच्या केबिनमध्ये हिंदीच्या प्राध्यापिका बसल्या होत्या. प्राचार्यांनी विचारले,

“तुम्ही हिंदी हा विषय ह्या वेळेला घेऊ इच्छिता? ह्यामागचे कारण काय? इतके दिवस काय झोपला होतात का?”

मी म्हणालो,

“सर, ‘सोशिओलॉजी’ या विषयाचे आतापर्यंत फक्त दोनच लेक्चर झाले आहेत. आम्हाला या विषयाबाबत संबंधित प्राध्यापकांकडून काहीच मार्गदर्शन मिळालेले नाही; त्यामुळे मी हा निर्णय घेतलाय.”

प्राचार्य म्हणाले,

“अरेच्चा! ही काय भानगड आहे? असे कसे होईल? आपण सर्व प्रोफेसरांना त्यांचे टाइमटेबल तर सुरुवातीलाच दिले आहे.”

त्यांनी बेल वाजवून शिपायाला बोलावले आणि त्याला म्हणाले,

“दत्ता, जरा कांबळे सरांना बोलावून आण बरं,”

प्राचार्यांनी हिंदीच्या प्राध्यापिकांना जायला सांगितले. मला मात्र त्यांनी थांबवून ठेवले.

थोड्या वेळाने कांबळे सर आले. मला पाहताच ते आश्चर्यचकित झाले. माझ्याकडे पाहत ते खुर्चीवर बसले.

प्राचार्य म्हणाले,

“तुम्ही पूर्ण वर्षभरात प्रथम वर्षाचे फक्त दोनच लेक्चर घेतली आहेत म्हणे? तुम्हाला टाइमटेबल मिळाले आहे ना?”

कांबळे सर म्हणाले,

“हो, टाइमटेबल मिळाले आहे.”

प्राचार्य म्हणाले,

“मग तुम्ही बाकीचे लेक्चर न घेण्याचे कारण काय आहे ते सांगा बरं.”

कांबळे सर रागाने माझ्याकडे पाहत म्हणाले,

“ह्याने काय माझी कम्प्लेंट केली आहे का?”

“अहो, तसं काही नाही. ह्याला दुसरा विषय घ्यायचा होता म्हणून हा आला आहे. त्याने सांगितले की ‘सोशिओलॉजी’ या विषयाचे अजूनपर्यंत फक्त दोनच लेक्चर्स झाले आहेत आणि नंतर झालेच नाहीत; त्यामुळे त्या विषयाचे मार्गदर्शन नसल्यामुळे त्याला दुसरा विषय घ्यायचा आहे. खरं आहे का हे?”

कांबळे सर काहीच बोलले नाहीत. ते आलटून-पालटून माझ्याकडे आणि प्राचार्यांकडे पाहत होते.

प्राचार्य म्हणाले,

“अहो, मी काय बोलतोय हे तुम्हाला समजतंय का? त्याला राहू द्या बाजूला.”

कांबळे सर परत गप्प बसले. त्यांची जणू काही वाचाच गेली होती.

“ठीक आहे. तुम्हाला बोलायचे नसेल, राहू द्या; पण आतापर्यंत तुम्ही प्रथम वर्ष कला शाखेच्या तुमच्या विषयाचे लेक्चर का घेतले नाही, याचे सविस्तर स्पष्टीकरण मला ताबडतोब लिहून द्या.”

कांबळे सर रागाने उठून निघून गेले.

प्राचार्यांनी मला पण जायला सांगितले. मी ऑफिसमधून बाहेर आलो. काही अंतरावर कांबळे सर दोन-तीन प्राध्यापकांसोबत बोलत उभे होते. मी बाहेर आलेला पाहताच ते माझ्याकडे हात दाखवत काहीतरी सांगू लागले.

दुसऱ्या दिवशी हिंदीच्या प्राध्यापिकांनी मला सांगितले,

“सर ने कहा है सब्जेक्ट चेंज के लिये एप्लिकेशन देने के लिये।”

मी लगेच तसं ‘एप्लिकेशन’ लिहून ऑफिसमध्ये दिले.

कॉलेज सुटण्याच्या वेळी मॅडम म्हणाल्या,

“तुम्हारा एप्लिकेशन सर ने मंजूर किया है, लेकिन तुम हिंदी का सिलॅबस कैसे पूरा करोगे? बीस कविताएँ और तीन नॉव्हेल्स हैं और सिर्फ तीन हफ्ते बचे हैं.”

“मैं कर लूँगा,” असे म्हणून मी हिंदी क्लास जॉईन केला.

एवढ्या कमी दिवसांत इतर पाच विषयांच्या अभ्यासाव्यतिरिक्त हिंदी विषयाचा अभ्यास पूर्ण करणे महाकठीण काम होते. इतर विषयांचे लेक्चर्स वेळेवर अटेंड केले असल्यामुळे त्यांचा अभ्यास माझ्या नियंत्रणात होता; परंतु हिंदी विषयाचा वर्षभराचा अभ्यास मला नव्याने सुरू करून वीस दिवसांत पूर्ण करायचा होता. मी रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करू लागलो.

मी ‘सोशिओलॉजी’ सोडून हिंदी विषय जॉईन केला हे ऐकून माझ्याबरोबर एका-दोन विद्यार्थ्यांनीही हिंदी विषय घेतला. आम्ही हिंदीच्या एक्स्ट्रा क्लासमध्ये बसू लागलो. प्राध्यापिका आम्हाला योग्य मार्गदर्शन देत होत्या.

मी सगळं विसरून खूप मेहनत घेऊन अभ्यास करू लागलो. ह्यामागे एकच कारण होते, अण्णांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला आर्ट्समध्ये प्रवेश दिला होता. त्यांचा विश्वास मला सार्थ ठरवायचा होता.

आतापर्यंत कॉलेजमध्ये घडलेल्या सर्व भानगडींबाबत मी त्यांना काहीच सांगितले नव्हते. सर्व विषयांत पास होणे आणि वर्ष वाया न घालवणे, हेच ध्येय मी माझ्यासमोर ठेवले होते.

कॉलेजमधलं ‘सब्जेक्ट चेंज’चं प्रकरण बरंच गाजलं. कांबळे  सरांना ‘लेक्चर’ न घेण्याविषयी लिखित स्पष्टीकरण द्यावे लागले होते. त्यावर कॉलेज व्यवस्थापनाने कारवाई करून त्यांना ‘वॉर्निंग लेटर’ दिले होते.

परीक्षा सुरू झाली. सर्व पेपर व्यवस्थित गेले. सर्व विषयांचा अभ्यास मी मन लावून केला होता. हिंदी विषयाच्या अभ्यासाची ‘रिव्हिजन’ करण्याचा वेळच मिळाला नव्हता. रात्रभर जागून ह्या विषयाचा ‘सिलॅबस’ मी कसातरी पूर्ण केला होता. त्या विषयात किती मार्क्स पडतील याची मनात धाकधूक सुरू झाली होती.

अनेक विद्यार्थ्यांनी आर्ट्स विषय फक्त ‘डिग्री’साठी घेतला होता. त्यांच्या मते पुढे फक्त दोनच पर्याय होते, एल.एल.बी. किंवा एम.ए. मला मात्र ह्या दोहोंपैकी काहीच करायचं नव्हतं.

काही आठवड्यांनी परीक्षेचा निकाल लागला. निकालाच्या दिवशी मी कॉलेजला गेलो. सर्वजण गटागटाने उभे राहून आपापल्या रिझल्टची मित्रांबरोबर चर्चा करत होते. माझ्या वर्गातील काहीजण तिथे उभे होते. त्यातील काहीजण सर्व विषयांत पास झाले होते; तर काहींचे एक-दोन विषय राहिले होते.

तेवढ्यात तिथे रवींद्र आला. त्याला पाहून सर्वांनी जल्लोष केला. तो ‘टॉप’ येणार, हे सर्वांनी गृहित धरले होते. सर्वांचे अभिनंदन स्वीकारून तो आपला रिझल्ट घ्यायला गेला.

मी थोडा वेळ मित्रांबरोबर बोलून माझा रिझल्ट घ्यायला निघालो. वाटेत रवींद्र भेटला. त्याच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

“टॉप आलो आहे,” मला पाहताच हातातील रिझल्ट हलवत तो म्हणाला.

“अभिनंदन!” मी म्हणालो.

माझ्याकडे न पाहताच तो मित्रांमध्ये घुसला. सर्वांनी त्याला उचलून घेऊन नाचवायला सुरुवात केली.

मी माझा रिझल्ट घेण्यासाठी ऑफिसजवळ पोहोचलो. तेवढ्यात हिंदीच्या प्राध्यापिका तिथे आल्या. विद्यार्थ्यांच्या  जल्लोषाकडे एकदा पाहून त्या म्हणाल्या,

“लगता है रवींद्र फर्स्ट आया है.”

“हाँ, वो अभी अपना रिझल्ट लेकर गया है. मुझे बोला कि वो फर्स्ट आया है.”

“रिझल्ट लिया तुमने अपना? मालूम है हिंदी में तुम्हें कितने मार्क्स मिले हैं?”

“नहीं मॅडम, वही तो लेने आया हूँ.”

“रुको, मैं लेकर आती हूँ तुम्हारा रिझल्ट,” असं म्हणून त्या ऑफिसमध्ये गेल्या.

मी बाहेर उभा राहून वाट पाहत थांबलो. काय रिझल्ट लागला असेल, ह्या विचाराने माझ्या हृदयाची धडधड जोरात सुरु झाली.

आज निकालाचा दिवस असल्यामुळे मी सकाळपासून जबरदस्त तणावाखाली होतो. जणू काही हि माझ्यासाठी शेवटची संधी आहे असे समजून मी अत्यंत कठोर मेहनत घेऊन अभ्यास केला होता. एकाही विषयात नापास होणे मला कधीच परवडले नसते कारण तसे काही झाले असते तर अण्णांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला नक्कीच तडा गेला असता. मी त्यांच्यासमोर परत कधी उभा राहू शकलो नसतो. परमेश्वराजवळ मी रात्रीपासून प्रार्थना करीत होतो कि मला सर्व विषयात पास कर आणि अण्णांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरव.

तेवढ्यात त्या माझा रिझल्ट घेऊन बाहेर आल्या. मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघितले. आश्चर्य आणि आनंद ह्यांचा संमिश्र भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पण त्यावरून काही अंदाज बांधता येत नव्हता. मी त्यांच्याकडून माझा ‘रिझल्ट’ घेण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले पण माझ्याकडे न पाहताच त्या रवींद्रला खांद्यावर घेऊन जल्लोष करणाऱ्या माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांकडे वेगाने गेल्या आणि माझा रिझल्ट त्यांना दाखवून मोठ्याने म्हणाल्या,

“अरे सुनो.. सुनो…! रवींद्र फर्स्ट नहीं आया है, धनंजय फर्स्ट आया है…!!”

हे ऐकताच मी थक्क झालो. क्षणभरासाठी माझ्या काळजाचा ठोकाच चुकला.

त्या ग्रुपचा जल्लोष क्षणार्धात शांत झाला. सर्वजण एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. त्यांनी रवींद्रला खांद्यावरून उतरवले.

मॅडमनी त्यांच्याकडे जाऊन रवींद्रकडुन त्याचा रिझल्ट मागितला. माझा आणि त्याचा रिझल्ट तपासून त्यांनी ग्रुपला दाखवले की वर्गात सर्वात जास्त मार्क्स मलाच मिळाले होते.

मी वर्गात ‘फर्स्ट क्लास फर्स्ट’ आलो होतो.

मी अजूनही ऑफिसच्या दारातच उभा राहून मित्रांच्या त्या घोळक्याकडे पाहत होतो. सगळं काही स्वप्नवत वाटत होतं; डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.

मॅडमनी हाक मारून मला त्या ग्रुपमध्ये बोलावले. सर्वांनी हस्तांदोलन करून माझे अभिनंदन करायला सुरुवात केली.

रवींद्रने माझ्याकडे एकदा पाहिले आणि माझ्याशी हस्तांदोलन न करताच तेथून निघून गेला. त्याला हे सगळं अनपेक्षित होतं; तरीही ते पचवायला त्याला जड गेले.

मॅडमनी अजून मला माझा रिझल्ट दिला नव्हता. मला ऑफिसकडे चालण्यास सांगून त्या पुढे निघाल्या.

ऑफिसजवळ येताच त्या म्हणाल्या,

“काँग्रेच्युलेशन्स!!”

“थँक यू, मॅडम,”

“पता है, तुमको हिंदी मी कितने मार्क्स मिले है?”

“नही मॅडम, आपने अभी तक मुझे मेरा रिझल्ट कहाँ दिया है?”

“अरे हाँ, ये लो, तुम्हारा रिझल्ट.” असे हसत हसत म्हणत त्यांनी मला माझा रिझल्ट दिला.

मी रिझल्ट त्यांच्या हातातून घेतला. सर्व विषयांत मला सत्तरच्या वर मार्क्स होते. हिंदीमध्ये मला शंभरपैकी पंच्याण्णव मार्क्स मिळाले होते.

बहुत अच्छे! तुमने बहुत अच्छी तरह से परीक्षापत्र लिखा है है.  मैंने कभी सोचा भी नहीं था कि तुम मेरे विषय में इतने अच्छे अंक लाओगे, वह भी इतने कम समय में पढ़ाई करके.”

“मॅडम, ये सब आपके मार्गदर्शन का फल है. आपका बहोत बहोत धन्यवाद्!”

त्या हसत म्हणाल्या,

अरे नहीं नहीं…, तुमने भी तो बहुत मेहनत की है। यह उसी का परिणाम है.”

पुन्हा एकदा त्यांचे आभार मानून मी घरी जाण्यासाठी निघालो. रस्त्याने जाताना मनात असंख्य विचार येत होते. मिळालेलं यश हे माझ्या दृष्टीने खूपच अनपेक्षित होतं. मागील काही दिवसातील घडलेल्या घडांमोडींच्या पार्शवभूमीवर हे यश उठून दिसत होतं. माझा तो दापचरीचा कोर्स, तीन महिने उलटून घेतल्यानंतर घेतलेला कॉलेजप्रवेश, सरांशी घेतलेला ‘पंगा’, क्रिकेट मध्ये कॉलेजला मिळून दिलेला पहिलावाहिला विजय, हिंदी विषयाचा वीस दिवसात केलेला अभ्यास, ह्या सर्व घटना मनःपटलावर येऊन जात होत्या.

विचार करीत मी बसमध्ये चढलो. बसमध्ये बहुतेक कॉलेजचीच मुलं होती. बऱ्याच जणांना कळलं होतं की मी रवींद्रला मागे टाकून ‘फर्स्ट क्लास फर्स्ट’ आलो आहे. ते सर्वजण माझ्याकडे पाहत आपापसात चर्चा करत होते.

घरी आल्यानंतर आई अण्णांना मी माझा रिझल्ट देऊन सांगितले कि मी वर्गामध्ये ‘फर्स्ट क्लास फर्स्ट’ आलो आहे. पहिल्यांदा त्यांचा विश्वासच बसला नाही. नंतर रिझल्ट बघून त्यांची खात्री पटल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला.. मी कॉलेजच्या पहिल्या वर्षात ‘फर्स्ट क्लास फर्स्ट’ येईन, असे त्यांना स्वप्नात देखील  वाटले नव्हते.

खरं तर मला देखील वाटले नव्हते; पण ते घडले होते.

कॉलेजच्या स्पोर्ट्समध्ये मी ‘वेटलिफ्टिंग’ स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला होता आणि क्रिकेटमध्ये ‘युनिव्हर्सिटी’ला कॉलेजच्या पहिल्या वहिल्या विजयाची नोंद केल्याबद्दल प्रशस्तिपत्रक.

माझं ‘पॅशन’ सांभाळून मी अभ्यास देखील सांभाळला होता. पूर्वीसारखं पारडं फक्त एका बाजूने झुकवलं नव्हतं.

अभ्यास आणि क्रिकेट यांचा समतोल राखून मी ‘फर्स्ट क्लास फर्स्ट’ आलो होतो.

ह्या दोन्ही भिन्न गोष्टी आता मी संतुलित केल्या होत्या. जिममध्ये स्वतःला घडवत होतो; शारीरिक आणि शैक्षणिक दृष्ट्या स्वतःला सावरायला शिकलो होतो.

सर्व काही स्वप्नासारखे वाटत होते. एकंदरीत माझ्या नवीन कॉलेज जीवनाची सुरुवात छान झाली होती.

ह्या सगळ्या प्रसंगांतून जाताना मी बऱ्याच गोष्टी शिकलोआणि समजलो कि,

“अडचणी आणि अपमान हेच कधी कधी आपल्या यशाची पायरी ठरतात. पण बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून स्वतःवर विश्वास ठेऊन, प्रामाणिकपणे मेहनत करून आणि ध्येयाकडे सतत वाटचाल करत राहिलं कि यश नक्कीच तुमच्या पावलांशी येतं ह्याचा मला अनुभव आला होता.”

क्रमशः…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *