आम्ही खोपोलीला राहायला आलो. खोपोली हे मुंबई–पुणे महामार्गावर वसलेले एक महत्त्वाचे शहर आहे. मोठे कारखाने, महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालय, पॉलिटेक्निक असा विस्तार असलेले हे औद्योगिकीकरणाने विकसित झालेले शहर मुंबई–पुणे या दोन महानगरांना जोडणाऱ्या बोरघाट किंवा खंडाळा घाटाच्या सुरुवातीला आणि सह्याद्री डोंगररांगांच्या पायथ्याशी वसलेले आहे.
त्या काळी महाराष्ट्रात स्वतःची परिवहन व्यवस्था राबवणारी नगरपालिका असलेले हे एकमेव शहर होते. औद्योगिकीकरणामुळे त्या शहरात प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. नागोठणे सारख्या निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या, प्रदूषणरहित गावाहून स्थलांतरित झालेल्या आम्हाला त्या शहरात स्वतःला ‘ॲडजस्ट’ करून घेणे खूप उशिरा जमले.
दरम्यान, वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मी गेलो. मनात अनेक स्वप्ने, नव्या सुरुवातीची आस आणि भविष्याबद्दल आशावाद होता; पण चालू शैक्षणिक वर्षाच्या मध्यंतरात मला प्रवेश नाकारला गेला. त्या क्षणी पायाखालची जमीनच सरकली. पुढे काय करावे, काहीच सुचेना. एक पूर्ण वर्ष हातातून निसटेल की काय, ही भीती मनात घर करून बसली. त्या भीतीला केवळ कल्पनेची छाया नव्हती; तिच्यामागे एक कारण दडलेले होते.
फ्लॅशबॅक…
माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन काळात क्रिकेट हा माझा खरा छंद होता. मी नववीत असताना नागोठणे गावातील ज्येष्ठ खेळाडूंचा समूह असलेल्या ‘जॉली क्रिकेट क्लब’कडून खेळणारा मी सर्वात कमी वयाचा खेळाडू होतो. जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये मी पहिल्या क्रमांकावर फलंदाजी करत असे.
पण मी फक्त खेळातच पुढे नव्हतो; मी शैक्षणिकदृष्ट्याही उत्कृष्ट कामगिरी केली. मी दहावी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो आणि एकूण दुसऱ्या क्रमांकावर आलो. पूर्वपरीक्षेत मी इंग्रजीमध्ये शंभर पैकी नव्वद गुण मिळवले होते. हा विक्रम वर्षानुवर्षे कायम राहिला. मी शाळेत सलग दोन वर्षे “आदर्श विद्यार्थी” पुरस्कार जिंकला होता. हा पुरस्कार शैक्षणिक, क्रीडा आणि अभ्यासेतर उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्याला दिला जात असे.
अकरावी-बारावी साठी मी पेण येथे वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. कॉलेजला जाण्यासाठी मी दररोज नागोठणे ते पेण एस.टी. बसने प्रवास करायचो. अंतर अंदाजे सत्तर किलोमीटर होते आणि पेणला पोहोचण्यासाठी सुमारे दीड तास लागत असे.
अकरावी–बारावी करता करता मी क्रिकेटमध्ये चमकू लागलो होतो. अर्थातच, अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. सामने खेळण्यासाठी जिल्हाभर फिरणे, मित्रमंडळींची साथ, कौतुकाची थाप… या साऱ्यांत अभ्यास हळूहळू मागे पडू लागला. वडील कामानिमित्त आठवड्यातील पाच दिवस घरी नसत; त्यामुळे मला तेवढीच मोकळीक मिळायची.
बारावीला संपूर्ण वर्गातून फक्त नऊ मुले उत्तीर्ण झाली. सुदैवाने त्या नऊमध्ये मी होतो; पण हा निकाल माझ्या क्षमतेला साजेसा नव्हता, हे मला आतून जाणवत होते.
मला पदवीधर होऊन पोलीस निरीक्षक (पी.एस.आय.) व्हायचे होते. त्या दिशेने वाटचाल करायची असेल तर कला शाखा योग्य वाटत होती. पण त्या काळी आर्ट्स म्हणजे टाइमपास, नोकरी न देणारा पदवी अभ्यासक्रम असे समजले जात असल्यामुळे मनाविरुद्ध कॉमर्सला प्रवेश घ्यावा लागला. अकाउंट्स, बुक-कीपिंग यांसारखे विषय मला जड जायचे. आकड्यांच्या त्या जगात माझे मन कधीच रमले नाही.
अभ्यासात अत्यंत हुशार असलेला मी क्रिकेटच्या वेडापायी अभ्यासापासून काहीसा भरकटत गेलो होतो. शाळेत सलग दोन वर्षे ‘आदर्श विद्यार्थी’ म्हणून नाव लौकिक मिळवणारा मी आता शिक्षणाच्या मैदानात तोंडघशी पडतो की काय, अशी लक्षणे दिसू लागली होती.
बारावी उत्तीर्ण होऊन मी कॉमर्स शाखेच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. तिथेही प्रगती धीमीच होती. क्रिकेट काही सुटत नव्हते. कॉलेजला दांडी मारून जिल्हास्तरीय स्पर्धा खेळण्यासाठी मी ठिकठिकाणी जात असे. कॉलेजचे पहिले वर्ष जेमतेम पास झाल्यानंतरही आमच्यात सुधारण्याची काही लक्षणे दिसत नव्हती. वडिलांनी तर माझ्याकडून काहीतरी होईल, अशी आशाच सोडून दिली होती.
अशातच त्यांच्या नजरेला वर्तमानपत्रातील एक जाहिरात पडली होती— “दूध उत्पादन व्यवस्थापन” या अभ्यासक्रमाची. हा कोर्स दापचारीला होता. बारावी उत्तीर्ण झालेल्या पात्र विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार होता. माझ्याबद्दल वडिलांना वाटत होते की कॉमर्समध्ये काही होणार नाही. त्यांनी मला त्या कोर्ससाठी अर्ज करायला लावले.
त्या क्षणी माझ्या पी.एस.आय. होण्याच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला. समोर दुसरा कोणताच मार्ग दिसत नव्हता. आयुष्य जणू एका वळणावर थांबले होते, जिथे माझ्या मनाची दिशा आणि परिस्थितीची दिशा पूर्णपणे भिन्न होत्या.
“हा कोर्स करून ह्याला कमीत कमी सरकारी नोकरी तरी मिळेल, एखाद्या डेअरीमध्ये,” वडील म्हणाले.
आई हसून म्हणाली, “अहो, गाई-म्हशी सांभाळायला काय कोर्स करावा लागतो का? ते तर कुणीही करेल! हा कसला कोर्स? दुसरे काहीतरी बघा त्याच्यासाठी.”
वडील बोलले, “आतापर्यंतचे ह्याचे पराक्रम बघितले आहेत ना? ह्याच्यासाठी सध्या हा एकमेव कोर्स उपलब्ध आहे.”
“ठीक आहे. तुम्हाला काय योग्य वाटतं ते करा,” आईने हवेत हात उडवून माघार घेतली.
मी अर्ज करून ‘कॉल’ची वाट पाहत होतो. खाकी वर्दीच्या नोकरीची स्वप्ने हवेत विरली होती. डोळ्यासमोर म्हशीचा गोठा आणि त्यात दूध काढत बसलेला मी, अशी चित्रं दिसायला लागली. सगळ्या बहिणी, “ए दुधवाल्या…! ए दुधवाल्या…!!” म्हणून चिडवायला लागल्या होत्या. त्यांच्या त्या हसण्यात मला माझ्या अपयशाची टोचणी जाणवत होती.
घरी आलेल्या मित्रांनाही वडिलांनी सांगितले,
“बंड्या आता ‘मिल्क मॅनेजमेंट’च्या कोर्सला जाणार आहे”
माझा मित्र मधू, ज्याच्याकडे त्याच्या काकांच्या जवळपास पन्नास–साठ गायी–म्हशी सांभाळायला होत्या, तो माझ्याकडे बघून हसला. अण्णांना म्हणाला,
“अहो अण्णा, आमच्याकडे एवढ्या गायी–म्हशी आहेत. मी कुठे काय कोर्स केलाय? तरी पैसे मिळतात ना…!!”
अण्णा त्याला म्हणाले,
“अरे, ह्या कोर्समध्ये दूध उत्पादन व्यवसायाची सगळी माहिती मिळते. एखाद्या सरकारी किंवा खाजगी डेअरीत चांगल्या पगाराची सुपरवायझरची नोकरी मिळेल ह्याला. हा आता हेच करेल.”
मधू माझ्याकडे बघून कसनुसा हसला. अण्णांना समजावण्यात काही हशील नाही, हे त्याला कळून चुकले. माझ्या ह्या परिस्थितीला मीच जबाबदार होतो.
मधूने दहावीनंतर शाळा सोडली होती आणि काकांच्या म्हशी सांभाळत होता. पी.एस.आय. होण्याचं वेड डोक्यात घेतलेला मी रोज सकाळी चार वाजता उठून रनिंगला जात असे. त्यावेळी हा मधू दररोज सकाळी माझ्यासोबत ‘रनिंग’ला यायचा. भल्या पहाटे बाहेर अंधार असायचा; सोबतीला म्हणून येणारा मधूच असायचा. तो त्याच्या घराच्या ओसरीत बाहेर झोपायचा. मी त्याला भल्या पहाटे उठवायला जायचो तेव्हा तो खूप वैतागायचा; पण तरीही कधीच ‘नाही’ म्हणाला नाही. माझ्यासोबत नेहमी यायचा.
वडिलांच्या बोलण्यात काळजी स्पष्ट जाणवत होती. दहावीनंतरच्या माझ्या ‘प्रगती’कडे पाहून ते चिंतेत पडले होते. ते स्वतः ‘क्लास-वन’ ऑफिसर असल्यामुळे मला नेहमी म्हणायचे,
“पी.एस.आय. व्हायचं स्वप्न बाळगू नकोस. आय.ए.एस., आय.पी.एस.ची तयारी कर. क्लास-वन ऑफिसर होण्याचा प्रयत्न कर.”
त्यांनी माझ्यासाठी ‘मनोरमा’चे जनरल नॉलेज इयरबुकही आणले होते; पण क्रिकेटच्या नादात मी त्याला हातही लावला नव्हता.
आता पी.एस.आय. होण्याचं स्वप्नही धूसर झालं होतं. ग्रॅज्युएशनचा मार्ग बंद झाल्याची जाणीव झाली होती. ‘मिल्क मॅनेजमेंट’चा कोर्स पूर्ण करून कुठल्यातरी डेअरीत नोकरी शोधणं एवढाच पर्याय उरल्यासारखं वाटत होतं. माझ्या ह्या परिस्तिथीला मीच जबाबदार होतो.
जेव्हा मी माझ्या भविष्याबद्दलच्या ह्या अनिश्चिततेशी झुंजत होतो, त्याचवेळी हा पूर आला होता. मला वाटलं होतं की या सगळ्या गोंधळात अण्णा त्या दुग्धशाळेबद्दल विसरून जातील; पण हा माझा गैरसमज होता.
दरम्यान, आमच्याकडे आश्रयासाठी आलेले कुटुंब त्यांच्या गावी गेले होते. एके दिवशी, जेव्हा आम्ही नागोठणे सोडून खोपोलीला जाण्याचा निर्णय घेत होतो, तेव्हा अण्णांनी मला सांगितले,
“हे बघ, ह्या पूर परिस्थितीमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे तुला पोस्टाद्वारे ‘कॉल’ येईलच याची गॅरंटी नाही. तू कसंही करून उद्या पालघरला आजोळी जा आणि तिथून कोणाला तरी घेऊन दापचरीला जाऊन तुझ्या कॉलचे काय झाले याची चौकशी कर. त्यांना पालघरच्या पत्त्यावर कॉल पाठवायला सांग. तू आता कॉल येईपर्यंत पालघरलाच राहा. आमच्याबरोबर खोपोलीला येऊ नकोस.”
अठरा-एकोणीस वर्षांचा मी अण्णांच्या ह्या बोलण्याने अवाकच झालो. प्रतिवाद करण्याची हिंमत नव्हती आणि बोलण्याची तर सोयच नव्हती.
पूर परिस्थिती अजून निवळलेली नव्हती; त्यामुळे त्या भागातील सर्व व्यवहार ठप्प होते. जाण्यासाठी कुठलेही साधन उपलब्ध नव्हते.
आईने अण्णांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला,
“अहो, अशा परिस्थितीत कुठे जाईल पोरगा? गाड्या चालू होऊ द्या, मग जाईल तो.”
पण वडील ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
रात्री आईने माझी बॅग भरून दिली. बॅग कसली,भली मोठी पत्र्याची ट्रंक होती ती. त्यात दोन चादरी, ब्लँकेट आणि माझे दोन-तीन जोड कपडे होते.
डोळ्यात अश्रू घेऊन मी दुसऱ्या दिवशी पहाटे घराबाहेर पडलो. माझ्यामागे घरातील सगळेजण निःशब्द अवस्थेत मला निरोप द्यायला उभे होते. कोणी काहीच बोलत नव्हते. मला हा एक वेगळं, विचित्र ‘फिलिंग’ होत होतं; जणू काही मी पुन्हा कधीही घरी येणार नव्हतो. मागे वळून बघावेसे वाटत होते; पण जमले नाही.
घराच्या गल्लीच्या वळणावर असताना,
“जपून जा रे…!” असा आईचा अस्पष्ट आवाज ऐकू आला.
डोळ्यातले अश्रू पुसून मी रस्त्याला लागलो.
पुराच्या पाण्यामुळे एस.टी. स्टॅन्डची वाताहत झाली होती; त्यामुळे एस.टी. सेवा बंद होती. दुसरे एखादे वाहन मिळण्यासाठी मला हाय-वे वरच जावे लागणार होते. ती ट्रंक माझ्या वयाच्या मानाने खूप मोठी आणि जड होती. आलटून-पालटून दोन्ही हातांनी ती घेऊन जात मी पंधरा–वीस मिनिटांनी हायवेवर पोहोचलो, तेव्हा बराच दमलो होतो.
एवढी मोठी ट्रंक सांभाळत पालघरला कसे जायचे, हा विचार मनात आला. रस्त्यावर ती भली मोठी ट्रंक घेऊन मी कुठले वाहन मिळते का ते पाहत उभा होतो. माझ्यासोबत आणखी काहीजण त्यांच्या गावी जाण्यासाठी उभे होते.
तेवढ्यात एक ट्रक आला. तो खोपोलीला चालला होता. ड्रायव्हरने दाराच्या खिडकीतून डोकावून विचारले,
“कुठे जायचे आहे?”
“पेणपर्यंत सोडता का?” मी विचारले.
“या, बसा!”
त्याने असे सांगताच आम्ही दोघे–तिघे आत चढलो. ट्रक सुरू झाला. मी क्लिनरजवळच्या लाकडी फळीवर दारात बसलो होतो.
नागोठणे गाव मागे पडत चालले होते. सर्वत्र चिखल, वाहून आलेला केरकचरा, उन्मळून पडलेली झाडे— असे दृश्य होते. वातावरणात दमट आणि कुजकट असा विचित्र दर्प पसरलेला होता. गाव राहण्यालायक राहिले नव्हते.
पालघरला कसे पोहोचायचे, ही चिंता लागून राहिली होती. मी कधी एकट्याने प्रवास केला नव्हता. परत माघारी फिरावंसं वाटत होतं; पण आता नाईलाज होता.
ड्रायव्हरने मला पेण नाक्यावर सोडलं आणि पुढे खोपोलीकडे निघून गेला. ती भलीमोठी ट्रंक घेऊन मी परत रस्त्यावर उभा राहिलो. येथे रहदारी थोडीफार सुरळीत होती. थोड्या वेळाने मुंबईला जाणारी एक बस आली. तिकीट काढून सीटवर बसलो. प्रवासात एस.टी. कंडक्टरला पालघरला कसे पोहोचायचे ते विचारून घेतलं.
सकाळी सात वाजता मी चहा बिस्कीट खाऊन घराबाहेर पडलो होतो. दुपारचे बारा-साडेबार वाजले होते. आईने डब्यात भाजी–पोळी दिली होती. बसमध्ये बसल्या बसल्या डबा उघडून जेऊन घेतले. प्रत्येक घासाबरोबर घराची आठवण येत होती आणि डोळे भरून येत होते.
मी मुंबई सेंट्रल स्टेशनवर उतरलो तेव्हा जवळजवळ दुपार उतरली होती. तिथून मी पालघरला जाणारी ट्रेन पकडली. ती मोठी ट्रंक ट्रेनमध्ये नेणे खूप कठीण होते. ट्रंक वाजवी पेक्षा मोठी असल्याने सर्वजण माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. सुमारे दीड ते दोन तासांच्या प्रवासानंतर, मी संध्याकाळी साडे सहा ते सातच्या सुमारास पालघरला पोहोचलो.
पालघरला पोहोचल्यावर टांगा करून आजोळी गेलो. टांग्याचा आवाज ऐकून आजी बाहेर आली. मला ती भलीमोठी ट्रंक घेऊन आलेला बघताच आजी मोठ्याने रडायला लागली. तिला वाटलं माझ्या घरचे सगळे पूरात वाहून गेलेत आणि मीच तेव्हढा एकटा वाचलोय. मोठ्याने हाक मारून तिने आजोबांना बाहेर बोलावले,
“अरे देवा.., अहो, लवकर बाहेर या.. हा बघा कसा एकटा आलाय. काय झालंय देव जाणे..?”
नागोठणे पुराच्या बातम्या वर्तमानपत्रातून आजी-अब्बाना माहित झाल्या होत्या. सगळे संदेशवहन बंद असल्यामुळे त्यांना आमच्या परिस्तिथीबद्दल काहीच कल्पना नव्हती. फक्त त्या पुरात उध्वस्त झालेल्या गावात आमची बदली झाली होती हे त्यांना माहित होतं. त्यात मी हा असा अचानक पेटी घेऊन आलेला पाहताच ती घाबरली होती. अब्बा देखील,
“काय रे, काय झालं ? घरचे सगळे कुठे आहेत ??” असे म्हणत घाबरे घाबरे माझ्याकडे आले.
“सांगतो, सांगतो..सगळे ठीक आहेत.” असे त्यांना सांगताच ती दोघे थोडी शांत झाली. घरात गेल्यावर त्यांना सर्व परिस्थिती सांगितली, माझं येण्याचं प्रयोजन सांगितलं तेव्हा कुठे आजीचं समाधान झालं. दुसऱ्या दिवशी माझ्यासोबत दापचरिला येण्याचे तिने कबूल केले.
सकाळी मी आणि आजी दापचरिला गेलो. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरीजवळ दापचरिला शासनाची प्रचंड मोठी डेअरी होती. तिथे महाराष्ट्र शासनाने ‘दूध उत्पादन व्यवसायाचे प्रशिक्षण केंद्र’ सुरु केले होते. गर्द वनराईत वसलेल्या ह्या डेअरीत अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन केंद्र, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, प्रशिक्षण केंद्र, कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची सोय, खेळासाठी पटांगण अशा सर्व सोयी होत्या.
मोठ्या प्रमाणात विस्तार असलेल्या ह्या डेअरीत विविध जातीच्या शेकडो देशी-विदेशी गायी, म्हशी ठेवल्या होत्या. त्या पशूंसाठी अत्याधुनिक गोठे बांधले गेले होते. त्यामध्ये त्यांच्या राहण्यासाठी खाजगी विभाग केले होते. अत्याधुनिक गोठ्यांमध्ये त्यांच्या साठी स्वच्छ चारा, पिण्यासाठी वाहते पाणी, पंखे, निचऱ्याची व्यवस्था केली गेली होती. कुठेही केरकचरा किंवा अव्यवस्थितपणा दिसत नव्हता. सफाई कर्मचारी सतत साफसफाई करत होते.
ऑफिसमध्ये चौकशी केल्यावर समजलं की माझी निवड झाली होती आणि मला ‘कॉल लेटर’ नागोठण्याच्या पत्त्यावर गेले होते. अण्णांचं बरोबर होतं; पूर परिस्थितीमुळे ‘कॉल लेटर’ कुठेतरी अडकले होते. क्लार्क ने मला ‘कॉल लेटर’ची ‘कॉपी’ दिली. मी मोठ्या नाखुशीनेच ती स्वीकारली.
प्रवेशासाठी पैसे भरायचे होते. ते मी आणले नव्हते. दोन आठवड्यांत पैसे भरून रुजू व्हा असे त्यांनी सांगितले. आम्ही ‘कॉल लेटर’ घेऊन पालघरला आलो.
दरम्यान, घरचे सगळेजण खोपोलीला शिफ्ट झाले होते. मी एक दिवस पालघरला राहून खोपोलीला जायला निघालो. सोबत मामा आला होता. घरी गेल्यावर अण्णांना सविस्तर सांगितलं. प्रवेश फी भरायची आहे, ते पण सांगितलं.
अण्णा म्हणाले, “ठीक आहे, रुजू व्हा.”
अजून दहा–बारा दिवसांचा अवधी होता. मला आता घर कायमचे सोडावे लागणार होते. माझी जेवणावरची इच्छाच उडाली. आरे डेअरी, महानंद डेअरी, अमूल दूध ह्यांची चित्र-विचित्र स्वप्ने पडायला लागली. कधी कधी त्या प्रशिक्षण केंद्रातल्या गाई, म्हशी स्वप्नात येऊ लागल्या.
एकदा स्वप्नात एका म्हशीचे दूध काढीत मी गोठ्यात बसलेलो असताना, त्या म्हशीने मला जोरदार लाथ मारली; त्या वेळी मी झोपेत ओरडत पलंगावरून खाली पडलो होतो. बाजूलाच मामा झोपला होता. तो घाबरून उठला आणि, “काय झाले, काय झाले?” असे विचारू लागला. त्याला काय सांगणार… कप्पाळ!
मध्येच एका भल्या मोठ्या परदेशी जर्सी गायीवर बसून, हातात काठी घेऊन मी फेरफटका मारत आहे, असे स्वप्न पडले आणि मग माझी झोपच उडाली. बुलेट मोटारसायकलवर खाकी वर्दी घालून, कमरेला पिस्तूल लावून आणि डोळ्यावर ‘रे-बॅन’चा काळा ‘एव्हिएटर’ मॉडेलचा गॉगल चढवून रुबाबात फिरण्याच्या दिवास्वप्नात रंगणारा मला, आता मी म्हशीवर बसून काठी फिरवीत फिरत आहे अशी स्वप्ने पडू लागली.
आता स्वप्नांपेक्षा वस्तुस्थितीच अत्यंत कठोर झाली होती हेच सत्य होते. एखादा फासावर जाणारा कैदी जसे त्याचे शेवटचे दिवस मोजतो; तसे मी माझे घरी राहण्याचे उरलेले दिवस मोजत होतो. दापचरिला जायला दोन दिवस उरले होते.
आईने बॅग भरायला घेतली. शेवटी मी अण्णांना सांगितले,
“मला एक संधी द्या. आर्ट्ससाठी खोपोलीला प्रवेश घेतो. मनापासून अभ्यास करीन.”
अण्णा म्हणाले, “तुला दापचरिला जायची इच्छा नाही का?”
मी काहीच बोललो नाही.
मी बोलत नाही हे पाहून आई म्हणाली,
“त्याची इच्छा नाही तर कशाला जबरदस्तीने पाठवता?”
अण्णा म्हणाले, “काय करणार बी.ए. करून? तीन वर्षे त्यात घालवणार. पुढे काय करणार?”
मी म्हणालो, “यु.पी.एस.सी. आणि एम.पी.एस.सी.साठी प्रयत्न करणार.”
“प्रयत्न…? ठीक आहे. जे करायचे ते कर.”
अण्णांनी आईकडे पाहत जणू नजरेतूनच म्हटले,
“आता हा काय दिवे लावणार, बघू या…” आणि दापचरिचा ‘मिल्क मॅनेजमेंट’चा विषय संपुष्टात आणला.
मामा दोन दिवस राहून पालघरला परत गेला. आता बी.ए. करून स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण व्हायचे आव्हान माझ्यापुढे होते. नियतीने मला आणखी एक संधी दिली होती आणि माझी स्वप्ने पुन्हा उभी राहात होती.
कॉलेजच्या प्रवेशाला नकार मिळाल्याचं कळताच अण्णा स्वतः माझ्याबरोबर कॉलेजला आले. प्राचार्यांना स्वतःची ओळख करून दिल्यावर आणि एकंदरीत परिस्थिती समजावून सांगितल्यावर मला ताबडतोब प्रवेश मिळाला.
ह्या सगळ्या प्रसंगातून जाताना मी बऱ्याच गोष्टी शिकलोआणि समजलो कि,
“जगातल्या कोणत्याही अपयशाने आपली ध्येये संपत नाहीत; ते फक्त आपल्याला नवीन मार्ग दाखवते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी, चिकाटी, प्रयत्न आणि आत्मविश्वास ठेवणारा शेवटी यशस्वी होतो. आपल्या स्वप्नांचा धैर्याने आणि संयमाने पाठपुरावा केला तर प्रत्येक अडथळा फक्त एक नवीन संधी बनतो.”
क्रमशः
