रात्रीपासून जिन्याच्या पायऱ्या त्या गढूळ पाण्यात बुडालेल्या होत्या त्यामुळे पायऱ्यांवर चिखल जमा झाला होता. कमालीच्या निसरड्या झालेल्या त्या पायऱ्यांवरून मी अत्यंत काळजीपूर्वक पावलं टाकीत वर चढून गेलो.
आतापर्यंतचा हा सर्व घटनाक्रम पंधरा ते वीस मिनिटांचा होता. पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याची दाट शक्यता असून सुद्धा मी त्या पुराच्या पाण्यात उतरण्याचे धाडस केले होते आणि अर्धवट पाण्यात बुडालेल्या घरात सुरक्षित पोहचलो होतो पण आता तो निसरडा जिना चढताना माझ्या मनात एकच विचार येत होता कि ह्या स्त्रीला तिच्या बाळासकट बाहेर सुखरूप कसे काढायचे. तो निसरडा जिना जेमतेम चढून मी वर जाताच त्या स्त्रीला अवसान आले.
“घाबरू नका..” असे तिला मी म्हणालो, पण खरे तर माझाच आत्मविश्वास थोडा डळमळू लागला होता. त्या घराचे बांधकाम अधिकांश लाकडी होते. त्यामुळे पुराच्या पाण्यात ते कितपत तग धरून उभे राहील ह्याची काही शाश्वती नव्हती तसेच आता निसरड्या जिन्यावरून उतरायचे होते.
” बाळाला तुम्ही घ्या, मी तुमच्या मागे मागे येतो.” मी तिला म्हणालो.
पण ती म्हणाली, “मला नाही जमणार, बाळाला तुम्ही घ्या मी तुमच्या मागे येते.”
विचार करायला वेळ नव्हता. मी बाळाला तिच्या हातातून घेतले आणि आम्ही जिना उतरून खाली उतरायला लागलो.
“पायऱ्या सांभाळून उतरा. पायऱ्यांवर चिखल जमा झाला आहे.” मी तिला सावधगिरीची सूचना दिली.
गढूळ पाण्यात अर्धवट बुडालेल्या त्या जिन्याच्या पायऱ्या दिसत नव्हत्या. विशेष म्हणजे माझे दोन्ही हात बाळाला धरण्यात गुंतले होते, अत्यंत सावधगिरीने मी जिन्याच्या त्या निसरड्या पायऱ्या उतरत होतो.
जराशी देखील चूक अत्यंत महाग पडली असती.
ओसरीच्या दाराशी पाणी अजून पर्यंत छाती पर्यंत होते. पाण्याची पातळी आणि दाराची वरची पट्टी ह्यामध्ये दोन अडीच फुटाचे अंतर राहिले होते. पाणी त्या स्त्रीच्या हनुवटी पर्यंत आले होते. पाण्यात अडकून पडण्यापेक्षा त्या जागेतून निघणेच योग्य होते. दरवाजाच्या त्या दोन अडीच फुटाच्या पोकळी मधून मी बाळाला हातावर उंच धरून बाहेर पडलो.
आता खरी अडचण हि होती कि माझे दोन्ही हात बाळाला सांभाळण्यात गुंतले होते. एक हात त्याच्या मानेखाली आणि एका हाताने त्याची पाठ धरली होती आणि आधारासाठी माझ्याकडे माझ्या हातांचा देखील आधार नव्हता. ती स्त्री माझ्या कंबरेला पकडून माझ्या मागे येत होती. मी बाळाला डोक्यावर घेतले होते. त्याच्या आईने त्याला एका फडक्यात गुंडाळलेलं होतं. ते फडकं पण आता पावसाने ओलं झालं होतं. पावसाचा शिडकावा तोंडावर पडताच बाळ अस्वस्थपणे हालचाल करून मोठ्याने रडू लागले. त्यामुळे मला त्याला सांभाळण्यास अत्यंत कठीण जाऊ लागले.
जसे जसे आम्ही पुढे चाललो तसे तसे बाळाच्या आईला आपले डोके पाण्याबाहेर ठेवण्यास कष्ट पडू लागले. पाणी तिच्या नका तोंडात जाऊ लागले. ती घाबरून काहीतरी ओरडत होती. पण आता लक्ष द्यायला वेळ नव्हता. माझे पूर्ण लक्ष आता बाळा वर केंद्रित झाले होते. जराशी चूक अत्यंत महागात पडली असती. आम्ही प्रवाहाच्या मध्यभागी आलो होतो. ती बाई आपले डोके पाण्याबाहेर ठेवण्याचा प्रयत्नांत माझ्या खांद्यांवर हात ठेवण्याचा प्रयत्न करीत होती आणि त्यामुळे मला तोल सांभाळण्यास अत्यंत कठीण जात होते.
मी बाळाला सतत डोक्यावर धरून राहिल्यामुळे माझ्या हातांना रग लागली होती तसेच त्या बाळाच्या आईचे हात माझ्या खांद्यावर होते. त्या मुळे माझ्या खांद्यांना आणि पाठीला देखील रग लागली होती. त्यात पाण्यातून जाताना प्रवाहामुळे तोल सांभाळणे कठीण जात होते आणि अचानक माझा पाय घसरला आणि माझा तोल गेला.
ज्यावेळी माझा तोल गेला त्यावेळेस शरीराला एक हिसका बसला त्या बाळाला धरून असलेल्या दोन हातांपैकी एक हात क्षणमात्र सुटला पण मी जिवाच्या आकांताने स्वतःला सावरत परत बाळाला पकडले आणि आता मी पाण्यात पडणार असे वाटत असतानाच पाठीमागून मला बाळाच्या आईने सावरून धरले. माझ्या काळजाचा ठोका क्षणमात्र चुकला. रस्त्यावर उभे असलेले लोक मोठ्याने ओरडले. मला सांभाळून चालण्याची सूचना देऊ लागले. काही क्षण आम्ही स्वतःला सावरत स्थिर उभे राहिलो आणि परत पुढे चालू लागलो. मात्र त्या धडपडीत तिला मात्र बरेच पाणी नाकातोंडात घ्यावे लागले.
काही वेळानंतर आम्ही सुखरूप पाण्याबाहेर येऊन रस्त्यावर आलो. बाळाला त्याच्या मामाकडे दिले. ते दोन्ही हाताने बाळाला धरून सारखे मला नमस्कार करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूंनी गर्दी केली होती. त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. बाळाची आई सारखी माझ्या पाया पडत होती. मी तिला कसेतरी समजावले. ती तिच्या मोठ्या भावाला मिठी मारून रडायला लागली होती. दोघेही रडत होते. बाळ मामाच्या कुशीत सुखरूप होते.
ह्या सगळ्या गडबडीत बरेच लोक तिथे जमा झाले होते. माझे ते ‘बचाव कार्य ‘ त्यांनी जवळून बघितले होते. मधू ने मला घट्ट मिठी मारली. लोक माझ्या खांद्यावर थाप मारून शाबासकी देत होते, हस्तांदोलन करून शाबासकी देत होते. सर्वांचे आभार स्वीकारून आम्ही घरी निघालो.
बराच वेळ पाण्यात राहिल्यामुळे शरीर गारठलं होतं. हुडहुडी भरून येत होती. पावलं नीट पडत नव्हती. चालताना बाळाची आई सारखी मला म्हणत होती, “तुझ्या रूपाने देवंच आला मदतीला. नाहीतर एवढे लोकं असताना एकजण देखील आमच्या मदतीला आला नाही, खरंच..!”
आम्ही सर्वजण घरी पोहचलो. आमची हाक ऐकून सर्वजण बाहेर आले. बाळाच्या आजी ने धावत जाऊन त्याला कवेत घेतले. मुलगी आईला मिठी मारून सारखी रडत होती. मी मदतीला आलो नसतो तर ते वाचलेच नसते असं सारखं म्हणत होती.
घरात गेल्यावर आई ने बाळासाठी दूध आणले आणि सगळ्यांसाठी चहा बनवला. गरम गरम चहाचे घुटके घेत असताना मी सगळ्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार करत होतो. त्यांच्या दृष्टीने मो एकदम ‘हिरो’ झालो होतो. जेव्हा त्यांना समजले कि मला पोहता येत नसून सुद्धा मी त्या पुराच्या पाण्यात उतरून त्यांच्या कुटुंबासाठी हे धाडस केलं तेव्हा सर्वजण अप्रूप नजरेने माझ्याकडे पाहू लागले.
“खरंच, तुझ्या रूपाने देवंच आमच्या मदतीला आला आज. तुझे उपकार आम्ही जन्मभर विसरणार नाही” सर्वजण मला म्हणत होते. माझे आई वडील माझ्याकडे अभिमानाने बघत होते.
